पर्यटकांमध्ये उत्साह; लवकरच होणार दर्शन : निवाराशेड उभारणीचे काम पूर्णत्वास : वन्यप्राण्यांसाठी विशेष खोल्यांची व्यवस्था
प्रतिनिधी /बेळगाव
शहरापासून अगदी मोजक्मया अंतरावर असलेल्या भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयात आता लवकरच सांबर, अस्वल आणि तरस दाखल होणार आहेत. त्यामुळे वन्यप्राणी प्रेमींबरोबर पर्यटकांची उत्सुकता वाढली आहे. यापूर्वी जंगलाचा राजा सिंह, वाघ, बिबटय़ा आणि कोल्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे पर्यटकांचा ओढा वाढला आहे. आता सांबर, अस्वल आणि तरस दाखल होणार असल्याने बघ्यांची संख्या वाढणार आहे.
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयाचा विकास साधला जात आहे. दाखल झालेल्या सिंह, वाघ आणि बिबटय़ांना राहण्यासाठी विशेष निवाराशेडची उभारणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर सांबर, अस्वल व तरस ठेवण्यासाठी निवाराशेड उभारणीचे काम पूर्णत्वास आले आहे. तब्बल 34 एकर परिसरात पसरलेल्या या मिनी संग्रहालयाचा वन्यप्राण्यांसाठी विकास साधला जात
आहे.
गतवषी टप्प्याटप्प्याने वन्यप्राणी दाखल झाले आहेत. त्याचबरोबर आता सांबर, अस्वल, तरस दाखल होणार आहे. याबरोबरच गवीरेडे व हरीणदेखील दाखल होणार असल्याची माहिती भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयातून उपलब्ध झाली आहे.
म्हैसूर येथील प्राणी संग्रहालयाच्या धर्तीवर भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयाची उभारणी केली जात आहे. याठिकाणी नियोजनबद्ध बांधणी करून वन्यप्राण्यांसाठी विशेष खोल्यांची व्यवस्था केली जात आहे. पक्ष्यांना ठेवण्यासाठीही विशेष शेड उभारले जात असून लवकरच विविध जातीचे पक्षीदेखील दाखल होणार आहेत.
पर्यटकांचा वाढता ओघ
प्राणी संग्रहालयात आतापर्यंत सिंह, वाघ, बिबटय़ा आणि कोल्हे दाखल झाले आहेत. याबरोबरच येत्या दोन-चार दिवसांत सांबर, अस्वल आणि तरस दाखल होणार आहे. त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी वन्यप्रेमी, पर्यटक आणि विद्यार्थी, बालचमूंमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्यानंतर भुतरामहट्टी प्राणी संग्रहालय पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओघ वाढला आहे. दैनंदिन महसुलातही वाढ झाली आहे.
संग्रहालयाची वेळ
भुतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालय दर मंगळवार वगळता दररोज सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 यावेळेत पर्यटकांना खुले करण्यात येत आहे. पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी शनिवार-रविवार व इतर सुटीच्या दिवशीदेखील सुरू ठेवण्यात येत आहे. प्रौढ व्यक्तींसाठी 40 रुपये तर 5 वर्षाखालील बालकांसाठी 20 रुपये शुल्क आकारणी केली जात आहे.
लवकरच पर्यटकांना पाहण्यासाठी खुले…
प्राणी संग्रहालयात येत्या दोन-चार दिवसांत अस्वल आणि तरस आणले जाणार आहेत. गतवषी सिंह, वाघ, बिबटय़ा आणि कोल्हे आणण्यात आले आहेत. कोरोनामुळे इतर प्राणी आणणे लांबणीवर पडले होते. मात्र आता लवकरच सांबर, अस्वल आणि तरस दाखल होणार आहेत. त्यानंतर लवकरच पर्यटकांना पाहण्यासाठी खुले केले जाणार आहे.
– राकेश अर्जुनवाड (आरएफओ भुतरामहट्टी)