वाघांबरोबर बिबटेही होणार दाखल : वनाधिकाऱयांकडून प्राणी संग्रहालयाची पाहणी : वन्यप्रेमींना लवकरच लुटता येणार टायगर सफारीचा आनंद
प्रतिनिधी / बेळगाव
शहरापासून अवघ्या 8 ते 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या भुतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयात लवकरच वाघ आणि बिबटे दाखल होणार आहेत. त्यामुळे या प्राणी संग्रहालयात आता वाघांचीही डरकाळी घुमणार आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी प्राणी संग्रहालयाचे राज्य अध्यक्ष एल. आर. महादेवस्वामी, मुख्य वनसंरक्षक बसवराज पाटील व उपवन अधिकारी एम. व्ही. अमरनाथ व इतर वनाधिकाऱयांनी प्राणी संग्रहालयाला भेट देऊन वाघ आणि बिबटय़ांसाठी उभारलेल्या निवारा शेडची पाहणी केली.
यावेळी महादेवस्वामी म्हणाले, नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात संग्रहालयासाठी निधीची घोषणा करण्यात आली आहे. या प्राणी संग्रहालयात पर्यटकांसाठी शॉपिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रत्येकी 20 रुपये असलेला तिकीट दर 40 रुपये करण्यात येणार आहे. शालेय सहलींसाठी सवलतीच्या दरात तिकीट दर आकारण्यात येणार आहे. या संग्रहालयातील प्राण्यांसाठी दत्तक योजना राबविण्यात येणार असून त्यामुळे संग्रहालयाचा विकास होण्यास मदत होणार आहे. एखादा वन्यप्राणी प्राणी संग्रहालयात आणण्यापूर्वी त्याला राहण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या निवारा शेडची व इतर बाबींची पाहणी करणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर वनाधिकाऱयांनी वाघ आणि बिबटे ज्या ठिकाणी ठेवले जाणार आहेत, त्या निवारा शेडची पाहणी केली.
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या भुतरामहट्टी येथील मिनी प्राणी संग्रहालयाचा म्हैसूर येथील प्राणी संग्रहालयाच्या धर्तीवर विकास साधण्यात येत आहे. तब्बल 34 एकर परिसरात पसरलेल्या या मिनी प्राणी संग्रहालयात नुकताच बेंगळूर येथील बन्नेरघट्टा बायोलॉजिकल पार्क येथून नकुल, कृष्ण आणि निरुपमा अशी नावे असलेले तीन सिंह दाखल झाले आहेत. त्या पाठोपाठ आता वाघ आणि बिबटेही आणण्यात येणार आहेत, अशी माहिती वनविभागाकडून उपलब्ध झाली आहे. त्यामुळे वन्यप्रेमींना लवकरच सिंहांबरोबर वाघाचे दर्शन घेता येणार आहे.
या प्राणी संग्रहालयाचा तब्बल 50 कोटी निधीतून विकास करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात तीन सिंह आणण्यात आले असून येत्या 15 ते 20 दिवसांत वाघ आणि बिबटे दाखल होणार आहेत. प्राणी संग्रहालयात वन्यप्राणी ठेवण्यासाठी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाची परवानगी लागते. त्यांची परवानगी मिळाल्याने वन्यप्राणी आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे सिंह, वाघ, बिबटय़ांसह चित्ता, अस्वल, गवीरेडे, कोल्हे, हरिण दाखल होणार आहेत. याकरिता विशेष खोल्यांची (होर्डिंग रूम) व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनामुळे वन्यप्राणी आणण्याच्या कामात व्यत्यय निर्माण होऊन विलंब झाला होता. मात्र, आता लवकरच वन्यप्राणी आणण्यात येणार आहेत.
निवारा शेडचे कामही पूर्णत्वास वाघ आणि बिबटय़ांना राहण्यासाठी बांधण्यात आलेल्या निवारा शेडचे कामही पूर्णत्वास आले आहे. वन्यप्राण्यांच्या खाद्याबरोबर संग्रहालयात पाण्यासाठी वन्य तलाव उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येणार आहेत. याबरोबरच टायगर घर निर्मितीची योजना अंतिम टप्प्यात आल्याने वन्यप्रेमींना लवकरच टायगर सफारीचा आनंद लुटता येणार आहे.