शाळांना सुटीमुळे वन्यप्राण्यांचे आकर्षण : सुटीच्या दिवशीही प्राणीसंग्रहालय खुले
प्रतिनिधी /बेळगाव
शहरापासून जवळ असलेल्या भुतरामहट्टी प्राणीसंग्रहालयात पर्यटकांची संख्या वाढत आहे. शिवाय आता शाळांना देखील सुट्टय़ा पडल्यामुळे पर्यटकांचा ओघ वाढणार आहे. सुट्टीच्या काळात विविध पर्यटनस्थळांना भेट देणाऱया पर्यटकांची संख्या अधिक असते. त्यामुळे शहराजवळ असलेल्या भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयाला भेट देणाऱया पर्यटकांची संख्या वाढणार आहे.
भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयात सिंह, वाघ, हरीण, बिबटे, कोल्हे, सांबर, मगर, तरस, चितळ यासह विविध पक्षी दाखल झाले आहेत. त्यामुळे वन्यप्राणीप्रेमींचा ओघ वाढला आहे. कोरोनामुळे गत दोन वर्षात सुट्टीच्या दिवसांत देखील संग्रहालय बंद ठेवण्यात आले होते. मात्र यंदा कोरोनाचा प्रकोप कमी झाल्यानंतर संग्रहालय खुले करण्यात आल्याने पर्यटकांची संख्या वाढली आहे.
मागील दोन वर्षात टप्प्याटप्प्याने वन्यप्राणी आणण्यात आले आहेत. शिवाय येथील 34 एकर परिसराचा विकास साधला जात आहे. त्यामुळे येत्या काळात पुन्हा वन्यप्राण्यांची संख्या वाढणार आहे. विशेष म्हणजे टायगर सफारीचे काम देखील अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे लवकरच टायगर सफारीचे स्वप्नदेखील पूर्ण होणार आहे.
प्राथमिक, माध्यमिक शाळांच्या वार्षिक परीक्षा संपल्या आहेत. त्यामुळे पालकांबरोबर प्राणी संग्रहालयात वन्यप्राण्यांना पाहण्यासाठी येणाऱया विद्यार्थ्यांची संख्या वाढणार आहे. तसेच सीमाहद्दीवरील निर्बंध हटल्याने वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली आहे. त्यामुळे बेळगावसह गोवा, कोकण आणि महाराष्ट्रातून देखील पर्यटक दाखल होणार आहेत.
कोरोनामुळे मध्यंतरी काही काळ प्राणी संग्रहालय बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे महसुलावर परिणाम झाला होता. सध्या पर्यटकांची संख्या सुट्टीच्या दिवशी वाढत आहे. त्यामुळे दैनंदिन महसूलही 20 ते 25 हजार रुपये आहे. मात्र आगामी काळात पर्यटकांबरोबर प्राणी संग्रहालयाला भेट देणाऱया विद्यार्थ्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे महसुलात ही वाढ होणार आहे.
प्राणी संग्रहालय मंगळवार वगळता दररोज सकाळी 10 ते 5 यावेळेत खुले करण्यात येत आहे. पर्यटकांच्या सोयीखातर शासकीय सुट्टीच्या दिवशी आणि रविवार, शनिवारदेखील सुरू ठेवले जात आहे. प्रौढ व्यक्तीला 40 रुपये तर 5 वर्षाखालील बालकांना 20 रुपये प्रवेश शुल्क आकारणी केली जात आहे.
प्राणी संग्रहालयात विकासकामे सुरू
शाळांना सुट्टी पडल्यानंतर येत्या काळात पर्यटक वाढतील. त्यामुळे महसूलही वाढेल. प्राणी संग्रहालयात विकासकामे सुरू आहेत. पर्यटकांना फिरण्यासाठी रस्ते आणि इतर सुविधा पुरविल्या जात आहेत. त्यामुळे पर्यटक मुलाबाळांसह दाखल होत आहेत.
– विनोद अंगडी (आरएफओ भुतरामहट्टी)
प्राणी संग्रहालयातील हरणावर हल्ला
भुतरामहट्टी येथील प्राणी संग्रहालयात असलेल्या एका हरणावर कुत्र्यांनी हल्ला करून जखमी केले आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दोन महिन्यांपूर्वी संग्रहालयातील एका सिंहाला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर प्राणी संग्रहालयाच्या सुरक्षिततेबाबत वन्यप्राणीपेमींतून चिंता व्यक्त होत आहे.
भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयात वाघ, बिबटय़ा, हरिण, सिंह, कोल्हा, तरस व इतर वन्यप्राणी दाखल झाले आहेत. काही वन्यप्राणी विशेष कोठडीत ठेवण्यात आले आहेत. तर हरिण, चितळ व तरस खुल्या वातावरणात सोडण्यात आले आहेत.
दरम्यान, या प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी सभोवती तारेचे कुंपण घालण्यात आले आहे. मात्र या कुंपणातूनच भटक्मया कुत्र्यांनी येऊन हरणावर हल्ला केला आहे. त्यामुळे प्राण्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चिंतेचा बनला आहे.