प्राणीसंग्रहालय लवकरच पर्यटकांसाठी खुले : दुर्मीळ पक्ष्यांचेही दर्शन शक्य
प्रतिनिधी / बेळगाव
शहरापासून अवघ्या आठ-दहा किलोमीटरवर असलेल्या भुतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयात गुरुवारी दोन वाघ दाखल झाले आहेत. त्यामुळे आता भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयात वाघांचीही डरकाळी घुमणार आहे. दाखल झालेल्या वाघांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती वनखात्याने दिली आहे.
म्हैसूर येथील प्राणी संग्रहालयातील हे दोन नर जातीचे वाघ असून प्राणी संग्रहालयात त्यांची स्वतंत्र होल्डींग रूममध्ये व्यवस्था केली आहे. केंद्रीय प्राणी संग्रहालयाने भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयात वन्यप्राणी ठेवण्यासाठी यापूर्वीच मंजुरी दिल्याने वन्यप्राणी दाखल होत आहेत. गत महिन्यात तीन सिंह दाखल झाले असून त्या पाठोपाठ दोन वाघही दाखल झाले आहेत.
म्हैसूर येथील प्राणी संग्रहालयाच्या धर्तीवर भुतरामहट्टी येथील प्राणी संग्रहालयाचा 50 कोटींच्या निधीतून विकास साधण्यात येत आहे. या प्राणी संग्रहालयात वन्यप्राणी ठेवण्यासाठी सुविधा पुरविल्या आहेत. गत महिन्यात बेंगळूर येथील बन्नेरघट्टा बायोलॉजीकल पार्क येथून दोन नर व एक मादी असे तीन सिंह दाखल झाले आहेत. त्यापाठोपाठ गुरुवारी दोन वाघ दाखल झाले आहेत. या तीन सिंहांसाठी 30 किलो मांस दररोज लागते. त्यात आता दोन वाघांची भर पडल्याने दररोज 50 किलो मांस उपलब्ध करावे लागणार आहे. यापूर्वी दाखल सिंहांची प्राणी संग्रहालयातील मुक्त वातावरणात चाचणी घेऊन त्यांना पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटकांना जंगलाच्या राजांचे दर्शन घेता येणार आहे.
एकाच ठिकाणी होणार
सर्व वन्यप्राण्यांचे दर्शन
प्राणी संग्रहालयात वन्यप्राण्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली असून वन्यप्राण्यांना होल्डींग रूम, आवास कोठडी व निवारा शेडची व्यवस्था केली आहे. आता या प्राणी संग्रहालयात तीन सिंह आणि दोन वाघ दाखल झाले असून लवकरच चित्ता, बिबटे, अस्वल, गवीरेडे, कोल्हे, हरिण आणले जाणार आहेत. त्यामुळे पर्यटकांना एकाच ठिकाणी सर्व वन्यप्राण्यांचे दर्शन घेता येणार आहे. जागेअभावी हत्ती वगळता इतर सर्व वन्यप्राणी आणले जाणार आहेत, अशी माहिती वनखात्याने दिली आहे.
वन्यप्राण्यांना ठेवण्यात येणाऱया निवारा शेडचे काम पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे लवकरच सर्व वन्यप्राणी दाखल होणार आहेत. वन्यप्राण्यांबरोबर विविध जातींच्या पक्ष्यांसाठीही व्यवस्था केली असून लवकरच विविध जातींचे पक्षी आणले जाणार आहेत. त्यामुळे दुर्मीळ पक्ष्यांचेही दर्शन होणार आहे.
टायगर सफारीचे स्वप्न पूर्ण
भुतरामहट्टी येथील प्राणी संग्रहालयात टायगर सफारी आणि टायगर घर निर्मितीची योजना आता पूर्ण झाली आहे. त्याबरोबर प्राणी संग्रहालयात दोन वाघ दाखल झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी लवकरच पर्यटकांना टायगर सफारीचा आनंद लुटता येणार आहे.