दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी सुरक्षा दल सज्ज
वृत्तसंस्था/ जम्मू
जम्मूच्या सांबा सेक्टरमध्ये भारत-पाकिस्तान सीमेवर आणखी एक भूमिगत भुयार मिळाल्यावर आता सीमा सुरक्षा दलाने भुयारविरोधी यंत्रणेवर काम सुरू केले आहे. 19 नोव्हेंबर रोजी जम्मूच्या नगरोटा येथील टोलानाक्यानजीक चकमकीत मारले गेलेल्या चारही पाकिस्तानी दहशतवाद्यांनी सांबा सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेनजीक सापडलेल्या भुयारातून घुसखोरी केली होती.
चालू वर्षात आंतरराष्ट्रीय सीमेवर मिळालेले हे तिसरे भूमिगत भुयार आहे. जम्मूमध्ये पाकिस्तानला लागून असलेल्या 198 किलोमीटर लांबीच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पहारा देणाऱया बीएसएफसमोर यामुळे नवे आव्हान उभे राहिले आहे. पाकिस्तानने घुसखोरी करविण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. सीमेवर बीएसएफच्या वाढत्या दक्षतेमुळे आता जमिनीखालून घुसखोरी करविली जात आहे.
यापूर्वीही चालू वर्षात सांबा सेक्टरमध्ये दोन भुयारे आढळून आली होती. यापूर्वी 2013 मध्ये सांबा आणि 2015 मध्ये आरएस पुरा सेक्टरमध्येही पाकिस्तानकडून भारतात खुलणाऱया भुयारांचा शोध लागला होता. 29 ऑगस्ट 2020 रोजी जम्मूच्या सांबा सेक्टरमध्ये भूमिगत भूयार आढळले होते. या भुयाराला वाळूच्या 8-10 पोत्यांनी झाकण्यात आले होते. यानंतर 4 नोव्हेंबर रोजी सांबा सेक्टरमध्येच भुयाराचा थांगपत्ता लागला होता.
अँटी टनेल मॅकॅनिझम
बीएसएफ आता नव्या सीमा व्यवस्थापन यंत्रणेच्या अंतर्गत पाकिस्तानच्या घुसखोरीच्या नव्या पद्धतीला प्रत्युत्तर देणार आहे. बीएसएफने अँटी टनेल मॅकॅनिझमवर काम सुरू केले असून यांतर्गत सीमेवर तयार करण्यात आलेल्या भूमिगत भुयारांचा शोध घेतला जाणार आहे. सप्टेंबर 2018 मध्ये सुरू करण्यात आलेल्या कॉम्प्रिहेंसिव इंटीग्रेटेड बॉर्डर मॅनेजमेंट पूर्ण झाल्यानेही सीमेवरून आणि खालून होणारी घुसखोरी रोखण्यास मदत मिळणार आहे. नदी किंवा नाले असल्याने कुंपण घालता न येणाऱया ठिकाणीही ही यंत्रणा काम करणार आहे.
स्थानिकांची भूमिका
अँटी टनेल मॅकॅनिझमवर लवकरच प्रत्यक्ष स्तरावर काम सुरू केले जाईल. भुयारविरोधी मोहिमांना वेग दिला जाणार असल्याचे बीएसएफच्या महासंचालकांनी म्हटले आहे. सीमावर्ती भागातील लोकांची यात विशेष मदत घेतली जाणार आहे. अनेक लोकांची शेती सीमेला लागून आहे. सीमावर्ती गावातील लोक ट्रक्टर किंवा पिककापणीसाठी यंत्रांचा वापर करतात. शेतकऱयांच्या या यंत्रसामग्रीचा वापर भुयार शोधण्यासाठी केला जाऊ शकतो.
हिवाळय़ातील आव्हान
सीमेखालून घुसखोरी आणि पाकिस्तानी रेंजर्सकडून होणाऱया गोळीबाराला प्रत्युत्तर देण्याचे काम बीएसएफला हिवाळय़ात करावे लागणार आहे. हिवाळय़ाच्या प्रारंभी झालेली घुसखोरी आणि भुयारे मिळाल्याने अधिक दक्षता बाळगावी लागणार आहे. या आव्हानाकरता सीमेवर बीएसएफ आणि सीमेच्या आत पोलीस तसेच सैन्य सज्ज आहे.