वृत्तसंस्था/ लंडन
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनतर्फे पुढील महिन्यात भुवनेश्वरमध्ये कनिष्ठ पुरूषांची विश्वचषक हॉकी स्पर्धा घेतली जाणार आहे. दरम्यान कोरोना संदर्भातील भारतीय शासनाच्या नव्या नियमावलीमुळे इंग्लंडने या स्पर्धेतून माघार घेतल्याची घोषणा सोमवारी केली आहे.
भुवनेश्व़रमध्ये कनिष्ठांची पुरूष विश्वचषक हॉकी स्पर्धा 24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान होणार आहे. या स्पर्धेमध्ये विविध देशांचे संघ सहभागी होत आहेत. या स्पर्धेवेळी भारतीय शासनाकडून कोरोना संदर्भातील नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. ब्रिटनहून येणाऱया प्रवाशांना लस घेतलेली असो अथवा नसो, दहा दिवसांच्या क्वारंटाईनला सामोरे जावे लागणार आहे. या नियमामुळेच इंग्लंडने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. अलिकडे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हॉकी फेडरेशनने आपले संघ या स्पर्धेसाठी पाठविले जाणार नसल्याचे कळविले आहे.