प्रतिनिधी / शिराळा
शिराळा येथील भूईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्मारक आराखडा तयार करण्यास राज्य सरकार सकारात्मक आहे. अशी माहिती आ. मानसिंगराव नाईक यांनी आज चिखली येथे झालेल्यापत्रकार परिषदेत दिली.
शिराळा तालुक्यातील पर्यटनविकासाचा आढावा घेण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिराळा तालुक्याचा दौरा करणार असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले.
शिराळा येथील भूईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाच्या ताब्यातून सोडवण्याचा एकमेव प्रयत्न झाला होता. त्या घटनेचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन हे स्मारक उभा राहणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा संपूर्ण जीवनपट सांगणारे हे स्मारक असणार आहे. स्मारक तयार करताना ऐतिहासिक वास्तूकलेचा विचार केला जाणार असल्याचेही ते म्हणाले.