वार्ताहर/ कोयनानगर
कोयनानगरसह पाटण तालुक्यात मंगळवारी 20 रोजी दुपारी 3 वाजून 21 मिनिटांनी व 3 वाजून 33 मिनिटांनी सलग दोन भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या धक्क्यांनी तालुका हादरला असून तीव्रता अनुक्रमे 3 रिश्टर स्केल व 2.8 रिश्टर स्केल इतकी होती.
कोयना विभाग हा कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाने भयभीत झाला असतानाच मंगळवारी दुपारी सलग दोन भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. मंगळवारी दुपारी 3 वाजून 21 मिनिटांनी एक व लगेचच 3 वाजून 33 मिनिटांनी दुसरा असे दोन धक्के जाणवले. 3 वाजून 21 मिनिटांनी झालेल्या भूकंपाची तीव्रता 3 रिश्टर स्केल इतकी होती तर खोली 16 किलोमीटर इतकी होती. केंद्रबिंदू कोयनेपासून 20 किलोमीटर अंतरावर वारणा खोऱयातील चिखली गावाच्या पूर्वेस 7 किलोमीटर अंतरावर होता. तर 3 वाजून 33 मिनिटांनी झालेल्या दुसऱया भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता 2.8 रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाची खोली 15 किलोमीटर इतकी होती. केंद्रबिंदू कोयनेपासून 20 किलोमीटर अंतरावर वारणा खोऱयातील चिखली गावाच्या पूर्वेस 7 किलोमीटर होता. या धक्क्यापासून कोयना धरणास कोणताही धोका नसून यामुळे कोणतीही वित्त व जीवितहानी झाली नसल्याचे कोयना सिंचन विभागाच्या उपकरण विभागाने कळविले आहे.