प्रतिनिधी /बेळगाव
महानगरपालिकेने अत्याधुनिक पद्धतीच्या भूमिगत कचराकुंडय़ा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत पहिली भूमिगत कचराकुंडी एसपीएस रोडवरील डिजिटल लायब्ररीशेजारी बसविण्यात येणार असून सदर काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. या अत्याधुनिक कचराकुंडीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याकरिता उर्वरित कामे पूर्ण करण्यात येत आहेत.
शहरात रस्त्याशेजारी किंवा इतरत्र कचरा पसरत असल्याने शहर स्वच्छ ठेवण्यासाठी भूमिगत कचराकुंडय़ा बसविण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर एक डस्टबिन आणि कॉम्पॅक्टर घेण्यात आले आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर एसपीएम रोडवरील डिजिटल लायब्ररी शेजारील जागेत शहरातील पहिली भूमिगत कचराकुंडी बसविण्यात आली आहे. आणखीन 15 अत्याधुनिक भूमिगत कचराकुंडय़ा खरेदीसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. याकरिता 41 लाखाच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आवश्यक ठिकाणी भूमिगत कचराकुंडय़ा बसविण्यात येणार आहेत.
सध्या एसपीएम रोड येथे बसविलेल्या भूमिगत कचराकुंडीचे काम अंतिम टप्प्यात आले असून ओला आणि सुका असा दोन्ही प्रकारचा कचरा वेगवेगळा जमा करण्यासाठी दोन कुंडय़ा बसविण्यात आल्या आहेत. महापालिका प्रशासनाने शहरात पहिलाच प्रकल्प राबविला असून नव्या प्रकारच्या अत्याधुनिक कचराकुंडय़ांचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्याकरिता रविवारी अंतिम काम सुरू होते. सदर प्रकल्पाचे लवकरच लोकार्पण होणार आहे.