प्रतिनिधी / म्हापसा
गोव्याची भूमी ही स्थानिक नीज गोंयकारांची आहे. भाऊसाहेब बांदोडकर यांनी स्थानिक लोकांचे हीत डोळय़ासमोर ठेवून मुंडकार कायदा अस्तित्वात आणला होता. मात्र नुकतेच सरकारकडून विधानसभेत सादर करण्यात आलेल्या भूमिपुत्र विधेयकाची दुरुस्ती करून ते विधेयक विधानसभेत पुन्हा सादर करेपर्यंत आपला या विधेयकास वैयक्तिक विरोध राहाणार असल्याचे सनसनाटी वक्तव्य कळंगुटचे आमदार तथा ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो यांनी कळंगुटात केले.
गोव्याचे प्रथम मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात मंत्री लोबो बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत कळंगुटचे सरपंच शॉन मार्टीन्स, स्वातंत्र्य सैनिक सिरीयाको डायस, जिल्हा पंचायत सदस्य दत्तप्रसाद दाभोळकर, कळंगूट भाजपा गट अध्यक्षा श्रीमती जोजफीना डायस, बाबरेश्वर देवस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत (चानू) चोडणकर, एकनाथ नार्वेकर, सुरज नाईक, सम्राट क्लब कळंगुटच्या प्रतिभा नार्वेकर, आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान स्थानिक बेघर गोमंतकीयांना स्वतःचे घर आणि गोरगरीब जनतेला शिक्षणाची दारे उघडी करून भाऊसाहेबांनी भऊमिपुत्रांसाठी अलौकिक असे कार्य केल्याचे मंत्री लोबो यांनी पुढे सागितले.
स्वातंत्र्य सैनिक सिरीयाको डायस
गोवा भूमिपुत्र अधिकारिणी विधेयक विधानसभेत घाईगडबडीत सादर करून सरकारने गोवा स्वातंत्र्य संग्रामात गोवा मुक्तीसाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केला आहे. गोमंतकीय जनता शांत तशीच समंजस आहे परंतु सरकारला यागोष्टीवरून त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहाणार नाही असे सिरीयाको डायस म्हणाले.
मगोचे निष्ठावंत एकनाथ नागवेकर
आग्वाद किल्ल्याचे संग्रहालयात रुपांतर व्हावे अशी स्थानिक जनतेची मागणी होती परंतु तेथील संग्रहालय खासगी संस्थेच्या ताब्यात दिल्यास त्याचे रुपांतर कसिनोत होणार नाही या गोष्टीकडे सरकारने लक्ष द्यावे. त्याचप्रमाणे भाऊसाहेबांच्या काळातील फुटबॉल पटू आलेक्स कुतिन्हो, पीटर गोमीस यांचे स्वारक बागा जंक्शनवर उभारण्यात यावे. कळंगुटात जोरदार पाऊस पडत असतानाही भाऊसाहेबांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाला स्थानिकांची आवर्जून उपस्थिती लाभली होती.