राष्ट्रीय हरित लवादाचा आदेश
सत्यवान घाडे/ गुहागर
गुहागरच्या पर्यटन वाढीसाठी उभारलेली गुहागर समुद्रकिनाऱयावरील सॉलीड जेटी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण, पुणे यांच्या आदेशानुसार रविवारपासून भूसुरूंग लावून नामशेष करण्यास सुरूवात झाली आहे. जेटी बांधताना पतन विभागाने सीआरझेडची परवानगी न घेतल्याने ही जेटी तोडण्याची वेळ आली आहे. पोकलेनने ही जेटी तुटत नसल्याने 5 महिन्यांच्या विश्रांतीनंतर पतन विभागाने भुसुरूंगाद्वारे जेटी नामशेष करण्यास सुरूवात केली आहे. परिणामी जेटीवर खर्च झालेले सुमारे 96 लाख रूपये वाया गेले आहेत. 3 ते 4 दिवस ही जेटी भुईसपाट करण्यासाठी लागणार असल्याचे समजते.
पतन अभियंता रत्नागिरी विभाग, पर्यटन विकास महामंडळ अंतर्गत बारावा वित्त आयोग सागरीकिनारी व सृष्टी पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री व विद्यमान आमदार भास्कर जाधव यांच्या प्रयत्नाने 2014 मध्ये सुमारे 96 लाख रुपये खर्च करून ही जेटी बांधण्यात आली होती. आमदार जाधव यांना नगर विकास राज्यमंत्रीपद मिळताच त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा गुहागरच्या विकासासाठी उपयोग व्हावा, यासाठी खास बाब म्हणून गुहागरच्या पर्यटन वाढीकडे लक्ष केंद्रीत केले. समुद्रकिनाऱयावरील सॉलीड जेटी, सीव्ह्यू गॅलरी, नाना-नानी पार्क, नक्षत्र उद्यानसारखे उपक्रम राबवले, परंतु हे उपक्रम राबवताना संबंधित विभागाच्या आवश्यक परवानग्या घेणे आवश्यक होते. पतन विभागाने समुद्रकिनारी जेटी बांधताना सीआरझेडची परवानगी घेतली नाही. परिणामी जेटीवर खर्च झालेले सुमारे 96 लाख रूपये वाया गेले आहेत.
गुहागर समुद्रकिनारी पर्यटकांना समुद्रस्नाबरोबर समुद्री लाटांचा जवळून आनंद घेता यावा, यासाठी ही जेटी उभारण्यात आली होती, परंतु प्रशासनाने केलेल्या एका चुकीमुळे हे उपक्रम आज नष्ट होत आहेत. जेटी बांधताना सीआरझेडची परवानगी घेतली नसल्याची तक्रार शहरातील बळवंत परचुरे यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण पुणे यांच्याकडे केली होती. गेली दोन वर्षे यावर सुनावणी सुरू होती. अखेर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण, पुणे यांनी दाव्याचा निकाल देताना सीआरझेड परवानगी नसलेली जेटी काढून टाकण्याचे आदेश दिले. यामुळे पतन विभागाच्यावतीने ही जेटी काढून टाकण्यात येत आहे.
31 ऑगस्ट 2020 रोजी ही जेटी काढण्यास सुरूवात करण्यात आली होती. जेटीचा उपठेका घेतलेले ठेकेदार विजय पवार यांनाच जेटी तोडण्यास पतन विभागाने सांगितले होते, परंतु पहिल्या दिवशी पोकलेननेही जेटी तुटत नसल्याने दुपारनंतर काम अर्धवट टाकून ठेवण्यात आले होते. त्यानंतर 5 महिन्यांनी 31 जानेवारी रोजी काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. जेटी तोडण्यासाठी चिपळूण येथील नवनाथ जाधव यांना 2 लाख रूपयांचा ठेका देण्यात आला आहे. शेकडो भूसुरूंग लावून जेटीला तडे देऊन ती तोडण्याचे काम सुरू केले आहे.
खर्च शासकीय की खासगी?
हरित लवादाने जेटी काढून टाकताना जेटी काढण्याचा खर्च हा शासकीय निधीतून करावयाचा नाही, तसेच जेटीवर झालेला सर्व खर्च संबंधितांकडून वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे जेटी तोडण्यासाठी पतन विभागाने टेंडर प्रक्रिया राबवली का, या बाबत पतन विभागाचे कनिष्ठ अभियंता राहुल सुळ यांना विचारणा केली असता त्यांनी मला सविस्तर माहिती नसल्याचे सांगितले. आपला पतन अभियंता सय्यद हुनेरकर यांच्याशी संपर्क होत नसून मला केवळ जेटी तोडणाऱया ठेकेदाराच्या मदतीला पाठवल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे जेटी काढताना होणारा खर्च हा शासकीय की खासगी, या बाबत पतन विभागाचे अधिकारी माहिती देताना टाळाटाळ करताना पहावयास मिळाले.
शासकीय कार्यालयीन वेळ सोडून केले जातेय काम
रविवार सुट्टी असतानाही पतन विभागाचे कनिष्ठ अभियंता जेटी तोडण्यासाठी गुहागर समुद्रकिनारी आले होते. शासकीय कार्यालयीन वेळेत जेटी तोडण्याचे काम का सुरू केले नाही, समुद्रकिनारी सार्वजनिक ठिकाणी भूसुरूंग लावताना पोलिसांची परवानगी घेतली का, या प्रश्नांची उत्तरे त्यांना देता आली नाहीत.
3 ते 4 दिवसांत समुद्रावरील जेटी पूर्णतः काढून टाकण्यात येणार आहे. यामुळे गेली 6 वर्षे गुहागरमध्ये येणाऱया पर्यटकांना समुद्राच्या लाटांचा जवळून आनंद देणारी ही जेटी कायमची नामशेष होणार आहे. गुहागर समुद्रकिनाऱयावरील पर्यटन वाढीसाठी उभारलेल्या कामांपैकी हे शेवटचे कामही काढून टाकण्यात आल्याने समुद्रकिनाऱयावर पर्यटन वाढीसाठी एकही उपक्रम शिल्लक राहिलेला नाही. यामुळे खरोखरच ही जेटी काढल्याने गुहागरच्या पर्यटनामध्ये वाढ होईल का, असा सवाल निर्माण होत आहे. यापुढे समुद्रकिनाऱयावर उपक्रम उभे राहतील का, हा विषय संशोधनाचा ठरला आहे.