दरड हटविण्याचे काम सुरू
वृत्तसंस्था / गंगटोक
मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनानंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 10 वरील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच सिक्कीम या राज्याचा उर्वरित भारताशी रस्तेमार्गाने असणारा संपर्क तुटला आहे. अधिकाऱयांनी सोमवारी सकाळी यासंबंधी माहिती दिली आहे.
सीमा रस्ते संघटनेचे (बीआरओ) जवान पश्चिम बंगालच्या कालिमपोंगमध्ये 29 माइल भागात महामार्गावरील दरड हटविण्याचे काम करत असल्याचे अधिकाऱयाने सांगितले आहे. रात्रभर झालेल्या भूस्खलनामुळे सुमारे 70 मीटरपर्यंत ढिगारा फैलावलेला आहे. एका बाजूने महामार्ग वाहतूक खुला करण्यासाठी देखील मोठा वेळ लागणार असल्याचे सांगण्यात आले.
सद्यकाळात वाहनांना एक पर्यायी अरुंद रस्त्यावरून वळविले जात आहे. हा रस्ता दार्जिलिंगच्या पर्वतांमधून जातो. सिक्कीमचे सीमावर्ती शहर रंगपोपासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावरील हे क्षेत्र राज्याची जीवनरेषा आहे. एनएच-10 वर कित्येकदा भूस्खलन होत असते. चालू वर्षातील पावसाळय़ात आतापर्यंत किमान 4 वेळा भूस्खलनामुळे वाहतूक ठप्प पडली आहे.