प्रतिनिधी / रत्नागिरी
कोकण रेल्वे मार्गावरील भोके रेल्वे स्टेशनवर मंगळवारी पहाटे बिबट्याच्या दर्शनाने तेथील कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. बिबट्याने स्टेशनच्या गॅलरीत झोपलेल्या कुत्र्याला पकडून नेल्याचे दृष्य तेथील सीसी टिव्हीत कमेराबद्ध झाले आहे.
या रेल्वे मार्गावरील भोके स्टेशन रत्नागिरीपासून काही मिनिटांच्या अंतरावर आहे. स्टेशन परिसर तसा जंगलाचा असल्याने परिसरात रानटी जनावरांचा वावर असतो. मंगळवारी पहाटे सव्वा तीनच्या सुमारास बिबट्या स्टेशनवर अवतरला. आजूबाजूचा अंदाज घेत अलगद पावलांनी स्टेशनच्या गॅलरीत येऊन त्याने झोपलेल्या कुत्र्यावर हल्ला केला. त्या कुत्र्याची मानगुटी पकडून लगोलाग तेथून पुन्हा जंगलाच्या दिशेने गायब झाला. हे सारे दृष्य स्टेशनवरील सीसी टीव्हीत कमेराबद्ध झालेय. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला असून त्याला रेल्वेच्या सूत्रांनीही दुजोरा दिला आहे.