निवृत्त मुख्य अग्निशमन अधिकारी दत्तात्रय मंडलिक यांना अनुभव, घरफाळा विभागाचा कारभार चव्हाट्यावर
प्रतिनिधी/कोल्हापूर
जुन्या घराच्या जागेवर नवीन बांधकाम करण्यासाठी रितसर परवाना घेतल्यानंतर बांधकामही पूर्ण झाले. पण महापालिकेच्या घरफाळा विभागाने नवीन घरफाळा न लावता जुन्या घरफाळ्याची बिले संबंधित मिळकतधारकाला दिली. त्याने त्या बिलाप्रमाणे घरफाळा भरला. आता मात्र भोगवटा प्रमाणपत्र नाही, या मुद्याखाली त्या मिळकतीचे बांधकाम बेकायदेशीर ठरविण्याचा प्रकार महापालिकेच्या घरफाळा विभागात घडला आहे. विशेष म्हणजे महापालिकेत तब्बल पस्तीस वर्षे सेवा बजावलेले निवृत्त मुख्य अग्निशमन अधिकारी दत्तात्रय मंडलिक यांच्यावर स्वतःच्या मातृसंस्थेतील अधिकाऱयाचा अनुभव या प्रकरणात घेण्याची वेळ आली आहे.
मंडलिक यांचे नाथागोळा तालीम परिसरात घर आहे. जुने वडिलोपार्जित घर पाडून त्याजागी नवीन घर बांधण्यासाठी त्यांनी 2005 मध्ये महापालिकेची रितसर परवानगीही घेतली. त्यानुसार बांधकामही पूर्ण झाले. त्यानंतर नवीन बांधकामाला नवीन पद्धतीने घरफाळा लागू करण्याची जबाबदारी घरफाळा विभागाची होती. पण मंडलिक यांना जुन्याच पद्धतीने घरफाळा बिले देण्यात आली. त्यानुसार मंडलिक यांनी घरफाळा भरला. दरम्यान, घरफाळा पडताळणीत मंडलिक यांच्या मिळकतीची असेसमेंट करत असताना त्यांनी भोगवटा प्रमाणपत्र सादर केले नसल्याने त्यांचे बांधकाम अनधिकृत ठरवून त्यानुसार घरफाळा आकारणी करण्यात यावी, असा शेरा अधिकाऱयाने मारला. बांधकाम अनधिकृत ठरविल्याने 70 वर्षीय दत्तात्रय मंडलिकांचा रक्तदाब वाढला. त्यांनी तत्काळ महापालिकेते धाव घेतली. पण त्यांची कुणीही दाद घेतली नाही. अखेर माजी नगरसेवक सचिन चव्हाण यांना त्यांनी आपले गाऱहाणे सांगितले. त्यांनी महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांची भेट घेऊन स्थितीची माहिती दिली. बांधकामासाठी परवानगी घेतली आहे. भोगवटा प्रमाणपत्र सादर केलेले नाही. मात्र जुन्या घराच्या प्रमाणे आजवर घरफाळा भरला आहे. घरफाळा विभागाने नवीन घरफाळा दिलेला नाही. नगररचना विभागाने पूर्णत्वाचा दाखला दिलेला नाही, यात मंडलिक यांचा काय दोष?, त्यांचे बांधकाम अनधिकृत ठरवित असाल तर नियम, कायदा सांगा? असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केल्यानंतर संबंधित अधिकारी निरूत्तर झाले. त्यांनी नगररचना विभागाकडे प्रकरण पाठवून त्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर चव्हाण आणि मंडलिक शांत झाले.
महापालिका वर्तुळात चर्चा
बांधकाम परवानगी घेऊन नवीन बांधकाम केल्यानंतर केवळ भोगवटा प्रमाणपत्र नाही म्हणून बांधकाम अनधिकृत ठरविण्याचा अधिकार अथवा कोणताही कायदा महाराष्ट्र महापालिका अधिनियमात नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱयांनी केवळ अपुऱया माहितीच्या आधारे किंवा अधिकाराचा वापर करून शेरा मारल्याची चर्चा महापालिका वर्तुळात होती.
प्रशासकराजमध्ये काही अधिकारी बेताल
सध्या महापालिकेत प्रशासकराज सुरू आहे. त्यामुळे अधिकारी वर्गात सर्व सत्ता केंद्रीत झाली आहे. त्यातून काही अधिकारी अधिकाराचा वापर करत अधिकार गाजवू लागले आहेत. त्यातून त्यांनी घेतलेले निर्णय वादग्रस्त ठरत आहेत. मध्यतंरी घरफाळा वसुलीसाठी एका अधिकाऱयाने जन्म-मृत्युचा दाखला देताना घरफाळा भरल्याचे पत्र दाखविण्याची सक्ती केली होती. जनतेवर सक्ती करताना महापालिकेतील कर्मचारी, अधिकारी त्या पद्धतीने जनतेची कामे वेळेत करतात काय?, असा प्रश्न उपस्थित करून काही संस्थांनी सक्तीला विरोध केला होता. त्यानंतर प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सक्ती मागे घेतली होती.