दोषींवर कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन मनसेचा इशारा
प्रतिनिधी / वाकरे, कोल्हापूर
गगनबावडा राज्यरस्त्यावर बालिंगा पुलाच्याखाली भोगावती नदीपात्रात अज्ञाताकडून जैविक कचरा टाकल्याचे निदर्शनास आले. असे कृत्य करून भोगावती नदी प्रदूषणात भर टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अमित पाटील यांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
बालिंगा पुलाखाली भोगावती नदीपात्रात दवाखान्यात वापरलेल्या सिंरिंज, इंजेक्शन, हँण्डग्लोज व इतर जैविक कचरा बेमालूमपणे अज्ञाताने नदीपात्रात टाकल्याचे बुधवारी कांही शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. दाट धुक्याचा फायदा घेऊन अज्ञातांनी हे कृत्य केले आहे. मात्र हा कचरा बालिंगे पुलाच्या पिलरच्या दुरुस्तीसाठी टाकलेल्या मुरूमाच्या ढिगाऱ्यावर तर काही सुया नदीपात्रात पडल्या,परिसरातील शेतकऱ्यांनी याची माहिती ग्रामपंचायतीच्या कार्यालयात दिली.मनसेचे कार्यकर्ते आंदोलन करणार असल्याचे समजताच बालिंगा ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी कचरा गोळा केला,मात्र तो बुजवण्याच्या प्रयत्न करण्यात आला. एक पोते भरेल एवढा हा जैविक कचरा होता.या ठिकाणी कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणारी नळपाणीपुरवठा योजना असून येथून कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा होतो.
तसेच नागदेववाडी, हणमंतवाडी, शिंगणापूर, साबळेवाडी, खुपिरे, शिंदेवाडी, वरणगे, पाडळी, चिखली, आंबेवाडीसह पंचगंगा नदीला हा प्रवाह मिळतो. पंचगंगा नदीचे पाणी पूर्व भागात जातो.त्यामुळे अशा कृत्यांमुळे नागदेववाडीपासून पूर्व भागातील जनतेचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.या सुया प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. असे कृत्य करून भोगावती नदी प्रदूषणात भर टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अमित पाटील यांनी बालिंगे येथील भोगावती नदीमध्ये दवाखान्यात वापरलेल्या सिरिंज, इंजेक्शन विना निर्जंतुकीकरण करता नदीमध्ये टाकण्यात आल्या आहेत, हा प्रकार लवकरात लवकर थांबवून लोकांच्या जीवाशी खेळणे थांबवावे, प्रशासनाने दोषींवर कठोर कारवाई करावी,अन्यथा मनसेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.
बालिंगे नदी परिसर, नव्हे कचऱ्याचे आगर
कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायीनी असणारी बालिंगे येथील भोगावती नदी आणि तिचा परिसर कचऱ्याचे आगर झाले असून कोणीही येऊन कचरा टाकावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.