ऑनलाईन टीम / भोपाळ :
मध्य प्रदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भोपाळमध्ये पुन्हा एकदा 10 दिवसांचे लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे. 24 जुलै रोजी रात्री 8 वाजल्यापासून हे लॉक डाऊन सुरू होईल. मागील काही दिवसांपासून राजधानी भोपाळमध्ये कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लॉक डाऊन जारी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती गृहमंत्री नारोत्तम मिश्रा यांनी दिली.
ते म्हणाले, 24 ते 2 ऑगस्ट या कालावधीत सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत कडक लॉक डाऊन असणार आहे. हे लॉक डाऊन निशातपूरा ते लांबाखेडा आणि भानपूर चौक ते आसाराम चौकपर्यंत असणार आहे. या भागात आवश्यक सेवा वगळून आणि सर्व दुकाने, कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.
दरम्यान, अवधपुरी, बागसेवानिया आणि पुराना शहरात पहिल्यापासूनच लॉक डाऊन सुरू आहे. हे लॉक डाऊन 2 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.