मध्यप्रदेशात कोरोनाग्रस्तांचा आलेख वाढत चालला आहे. भोपाळमध्ये आयएएस अधिकारी सोमेश मिश्रा यांना कोरोनाची बाधा झाली आहे. शहरात आतापर्यंत 4 अधिकाऱयांना कोरोनाची लागण झाली आहे. मिश्रा हे वैद्यकीय शिक्षण विभागात कार्यरत असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी विजय कुमार, पल्लवी जैन गोविल आणि गिरीश शर्मा या आयएएस अधिकाऱयांना कोरोनाची बाधा झाली होती. भोपाळमध्ये आतापर्यंत 142 रुग्ण सापडले असून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. इंदोरमध्ये रविवारी 8 नवे रुग्ण सापडले असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात 585 बाधित असून 43 जणांचा बळी गेला आहे.
इंदोरमधून रविवारी विमानाने 1200 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या सर्वांचा अहवाल सोमवारी उशिरा हाती लागणार होता. एकूण 1700 जणांचा अहवाल मिळणार आहे. राज्य सरकारने दिल्लीमधून 10 लाख 50 हजार हायड्रॉक्सी क्लोरोक्विन आणि 80 हजार एजिथ्रोमायसिन टॅबलेट मागविल्या आहेत.
राज्य सरकारने सोमवारपासून सर्व किराणा दुकाने सुरू करण्याचा निर्देश दिला आहे. या निर्णयामुळे नियमांचे पालन करत आवश्यक सामग्री प्राप्त करू शकतील. दुकानदाराने अधिक दराने सामग्रीची विक्री केल्यास त्याची तक्रार करण्याचे आवाहन प्रशासनाने जनतेला केला आहे. तक्रारीत तथ्य आढळल्यास दुकानदारावर गुन्हा नोंद होणार आहे.