ऑनलाईन टीम / पिंपरी चिंचवड :
पुणे जिल्ह्यातील भोसरी विधानसभा मतदार संघातील भाजपचे आमदार महेश लांडगे यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी सकाळी त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. पिंपरी चिंचवडमधील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सध्या पुणे शहरात तसेच पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शहर दौऱ्यावर आले असताना लांडगे त्यांच्यासोबत होते. कोविड समर्पित वायसीएम रुग्णालयाला त्यांनी भेट दिली होती.
आमदार लांडगे यांना त्रास होऊ लागल्याने त्यांच्या घशातील द्रवाच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या हायरिस्क कॉन्टक्टमधील नागरिकांची आता तपासणी केली जाणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पुणे विधान भवनात जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक झाली होती. या बैठकीला आमदार महेश लांडगे हेही या बैठकीला उपस्थित होते.