प्रतिनिधी/मिरज
तालुक्यातील भोसे येथे शेतातील रस्त्यावरुन ऊसाची ट्रक्टर नेण्यास वाट करून दिल्याने आशा मोहनदास काळे (वय 36, रा. पाटील गल्ली, भोसे) या महिलेला दगडाने मारहाण करण्यात आली. याबाबत त्यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली असून, काकासा पिराजी काळे, पोपट काकासा काळे या बाप-लेकावर गुन्हा दाखल झाला आहे.
भोसे गावातील काळे वस्ती येथे 176 व 179 गट नंबरमध्ये काळे यांची शेतजमीन आहेत. त्यांनी शेतात ऊस लावले असून, तोडणीनंतर सदरचा ऊस कारखान्याकडे जात आहे. शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास आशा काळे यांच्या शेतातील ऊस घेऊन ट्रक्टर जाणार होता. ट्रक्टर शेतातून बाहेर काढण्यासाठी आशा काळे या वाट करुन देत होत्या.
त्यावेळी काकासा पिराजी काळे, पोपट काकासा काळे हे बाप-लेक तेथे आले. त्यांनी आशा काळे यांना तू आमच्या शेतात ट्रक्टर न्यायची नाहीस. ही वाट आमची आहे. तू येथून वाट करायची नाहीस, असे म्हणून अश्लिल शिवीगाळ करत दमदाटी केली. तेथेचे पडलेला दगड घेऊन आशा काळे यांच्या पाठीत मारला. यामध्ये त्या जखमी झाल्या आहेत. सदरचे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या आशा यांचे पती भानुदास यांनाही मारहाण करण्यात आली. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात नोंद झाली आहे.