क्यूआर कोड कार्यशाळा उत्साहात
कोल्हापूर / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, कोल्हापुर, फॅमिली फार्मिंग शेतकरी उत्पादक कंपनी यांचे संयुक्त विद्यमाने मोरेवाडी येथील मॅनेज प्रशिक्षण केंद्रात बुधवारी शेतमालाच्या गुणवत्तेसाठी QR कोडचा वापर याबाबत कार्यशाळा पार पडली यावेळी सुभाष घुले मार्गदर्शन करत होते
कार्यशाळेचे उद्घाटन दीपप्रज्वलन व गणेश मूर्ती व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन कृषिभुषण सुधीर चिवटे यांचे हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी गुळ संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. बी. जी. गायकवाड, पणनचे उपसरव्यवस्थापक, फॅमिली फार्मिंगचे चेअरमन उदय पाटील, कृषिभुषण पी.डी. सावंत, आजरा घनसाळ चे संभाजी सावंत, इनोटेरा टेकचे रजनीश खरे, राज दवे व अजय उजागरे 6 उपस्थित होते.
या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना सुभाष घुले यांनी कोल्हापुर जिल्ह्यातील केळी, गुळ, आजरा घनसाळ व नाचणी इ. शेतमालाचे मार्केटिंग करतांना शेतकऱ्यांनी QR कोडचा वापर करण्याची गरज निर्माण झाल्याचे नमुद केले ते म्हणाले, ग्राहकांचा विश्वास संपादन करण्याची संधी शेतकऱ्यांना प्राप्त झालेली आहे. QR कोडमुळे ग्राहकांना शेतमालाच्या गुणवत्तेबाबत हमी मिळणार असुन शेतकऱ्यांना अधिकचा दर मिळण्यास मदत होणार असल्याचे सांगीतले. यनोटेरा कंपनीच्या वतीने रजनीश खरे, राज दवे व अजय उजागरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी एखाद्या शेतमालाचे QR कोड करण्यासाठी सुरवातीस अंदाजित 15 हजार पर्यंत खर्च एक वेळ करणे आवश्यक असुन त्यानंतर प्रति स्टिकर खर्च येतो. यामध्ये त्यांनी केळी पिकासाठी 30 पैसे प्रति किलो प्रति स्टिकर, आजरा घनसाळ भातासाठी 60 पैसे प्रति किलो प्रति स्टिकर, गुळासाठी 30 पैसे प्रति किलो प्रति स्टिकर खर्च अपेक्षित असल्याचे नमुद केले.
QR कोडमुळे ग्राहकांना सदर उत्पादना संदर्भातील उत्पादकाचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, उत्पादना विषयी सविस्तर माहिती, भौगोलिक ठिकाण, उत्पादन काढल्याचे दिनांक, पॅकिंग केल्याचे दिनांक इ. बाबतची माहिती प्राप्त होणार आहे. QR कोडच्या वापरामुळे शेतकरी मार्केटिंगसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन डिजिटलायझेशनच्या युगामध्ये प्रवेश करणार हे नक्की. कार्यक्रमाच्या शेवटी अनुप थोरात यांनी उपस्थितांचे आभार मानले.क्यूआर कोड कार्यशाळेच्या शुभारंभ प्रसंगी सुभाष घुले, उदय पाटील, कृषिभुषण पी.डी. सावंत, संभाजी सावंत, रजनीश खरे, राज दवे व अजय उजागरे आदी