खासदार उदयनराजे भोसले ; आमची लोकप्रयिता खुपतेय
प्रतिनिधी / सातारा
जनमानसात आमची एक वेगळी छबी असून आम्ही सामान्य जनतेकरीताच आजपर्यंत जीवन व्यतीत केले आहे. काहींना आमची धडाडी आणि लोकप्रियता खुपत असते म्हणूनच कथित भ्रष्टाचाराचे मोघम आणि बिनबुडाचे आरोप करणे हा त्यांचा स्थायी भाव बनला आहे. लोकांच्या गतीमान सोयी-सुविधांसाठी कोणत्या योजना राबविणे, लोकहिताची अंमलबजावणी करणे ही जर भ्रष्टाचाराची व्याख्या असेल तर होय आम्ही भ्रष्टाचार केला आहे. भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करणे म्हणजे चोराच्या उलटय़ा बोंबा आहेत. असल्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले.
आम्ही सुरु केलेली इनोव्हेटीव्ह सातारा ही योजना समाजाची आणि समाजहित साध्य करुन चिरकाल चालणारी आहे. ज्या लोकांना इनोव्हेटीव्ह सातारा या शब्दाचा अर्थ आणि शब्दाचे स्पेलिंग अचूक सांगता येणार नाही, त्यांनी आमच्या इनोव्हेटीव्ह सातारा या उपक्रमाविषयी काही बोलू नये असे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात नमुद केले आहे की, सहकाराचा गळा घोटून स्वाहाकार करुन आता रियल इस्टेटमध्ये घुसलेल्या व्यक्तींनी आजपर्यंत फक्त स्वार्थ पाहीलेला आहे. स्वार्थ नसेल तर त्यांचा कोणताही उपक्रम होत नाही. अश्या व्यक्तींना निस्वार्थीपणे नागरिकांच्या हितासाठी काम करणाऱया व्यक्तींची वाढती लोकप्रियता सहन होणारी नाही म्हणून त्यांची नेहमीच कुरकूर असते.
उदयनराजें हे नेहमीच समाजासाठी जगणारी व्यक्ती म्हणून उभ्या महाराष्ट्राला परिचित आहे. कुणी कितीही उलटय़ा बोंबा मारत असले तरी त्या बोंबा मारणाऱयांना समाजाने पुरते ओळखले आहे. शाश्वत विकासाच्या गप्पा ठोकणाऱयांनी, चालवता आल्या नाहीत म्हणून दोन सहकारी बँकांचे विलिनीकरण केले. तरीही उजळ माथ्याने हिंडणाऱयांचा सहकारातील अचंबित करणारा शाश्वत विकास सभासद, नागरिकांनी पाहीला आहे. त्यांचे पोटात एक आणि ओठात एक या वैशिष्ठयाचा अनेकांना बसलेला झटका लोक विसरलेले नाहीत म्हणून बेछूट, बेताल आरोप करुन त्यांचा सुरु असलेला चारित्र्य हननाचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. आम्ही त्यांच्या वक्तव्याला फारशी किंमतही देत नाही.
संबधितांना तरीही आरोप करायचे असतील तर ते त्यांनी पुराव्यानिशी आणि चारचौघांत चर्चेला सामोरे जावून, सिध्द करुन दाखवावेत असे आमचे आव्हान आहे. खऱयाला मरण नाही हा सूर्य आणि हा जयद्रथ करायला आम्ही तयार आहे, असेही खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हणाले आहे.