कामगारांचे वेतनवाढीच्या पैशावर डल्ला मारल्याचा गंभीर आरोप
उचगाव / वार्ताहर
आकृतीबंधामध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी एका कर्मचाऱ्याकडे लाचेची मागणी करणारे गांधीनगरचे ग्रामविकास अधिकारी चंदन चव्हाण याची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य शैलेश शिंदे व रियाज सनदी यांनी केली.
ईगल ग्रुपच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले की चव्हाण यांच्या भ्रष्ट कारभाराविषयी ग्रामपंचायतीपासून थेट पालकमंत्र्यांपर्यंत तक्रारी सादर केल्या आहेत. गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांना सक्तीच्या रजेवरही पाठवले आहे.
राज्य शासनाच्या जागेवर ग्रामपंचायतीचा ठराव करून चुकीच्या नोंदी घालणे, एका खर्चाची नोंद दोन वेळा करणे, कामगारांच्या वेतनवाढीतून दोन महिन्यांचे वेतन घेणे, आशा स्वयंसेविकांकडून चार महिन्याचे काम करवून घेऊन त्यांना एक महिन्याचे वेतन देणे, चुकीचे व बोगस बांधकाम परवाने देणे, बोजा चढवण्यासाठी पैशाची मागणी करणे, बांधकामासाठी बांधकामधारकाकडून पैशाची मागणी करणे असे भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप चव्हाण यांच्यावर करण्यात आले आहेत.
त्याची चौकशी होऊन त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणीही शिंदे व सनदी यांनी केली आहे.यावेळी त्यांनी केलेल्या आरोपांबाबत पुरावे व विविध ऑडिओ क्लिपही सर्वांसमोर सादर केल्या.या पत्रकार परिषदेस शैलेश शिंदे,रियाज सनदी, प्रदिप झांबरे, सुहास भोसले, रोहन बुचडे, जहिदा इनामदार,प्रताप चंदवाणी होते.