नवजात अर्भकाच्या गर्भनाळेत (प्लासेन्टा) मायक्रोप्लास्टिकचा शोध प्रथमच लागला आहे. संशोधकांचे असे म्हणणे आहे की, यक्रोप्लास्टिकचे कण भ्रूणाच्या विकासावर प्रतिकूल परिणाम करू शकतात. मुलाच्या रोगप्रतिकार शक्तीवरही त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा बालकांची भविष्यात रोगांशी लढण्याची क्षमता खूपच कमी होऊ शकते.
- शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, मायक्रोप्लास्टिकच्या या कणांमध्ये पॅलेडियम, क्रोमियम, कॅडमियम असे विषारी धातू आहेत. अर्थात, मायक्रोप्लास्टिकचा परिणाम किती घातक असेल, याबाबत अद्याप ठोस माहिती पुढे आलेली नाही.
- रोममधील फेटब्रेनेफ्राटेली हॉस्पिटल आणि पोलेटेक्निका डेल मार्श विद्यापीठाने या बालकांवर संशोधन केले आहे.
- ‘जर्नल एन्व्हायर्नमेन्ट इंटरनॅशनल’मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधन अहवालानुसार, चार निरोगी महिलांच्या गर्भनाळेमध्ये मायक्रोप्लास्टिकचे कण आढळून आले आहेत. ही संपूर्ण जगासाठी अत्यंत चिंताजनक बातमी आहे.
- संशोधनादरम्यान असे दिसून आले की, गर्भनाळेबरोबरच मेम्ब्रेनमध्येही (गर्भाशयाचा पापुद्रा) हे कण होते. याच गर्भाशयात भ्रूणाची वाढ होते.
- शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, गर्भनाळेत डझनावारी मायक्रोप्लास्टिकचे कण आढळून आले. परंतु त्यातील केवळ चार टक्के कणांचीच तपासणी करणे शक्य झाले.
- तपासणीच्या अहवालातून असे स्पष्ट झाले की, हे कण लाल, निळ्या, केसरी आणि गुलाबी रंगांचे आहेत. रंग, पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणारी सामग्री, सौंदर्य प्रसाधने आणि पर्सनल केअर प्रॉडक्ट्स आदींच्या माध्यमातून महिलांच्या शरीरात हे कण पोहोचले.
- अहवालानुसार, मायक्रोप्लास्टिकच्या कणांचा आकार 10 मायक्रॉनपर्यंत होता. हे कण इतके लहान असतात की, रक्ताच्या माध्यमातून शरीरात कुठेही जाऊ शकतात. हेच कण अर्भकाच्या शरीरात पोहोचले आणि त्यामुळे या बालकांचे नुकसान होऊ शकते.
- संशोधकांचे म्हणणे असे आहे की, भ्रूणाच्या विकासासाठी गर्भनाळेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. या ठिकाणी एखादी अशी विषारी गोष्ट पोहोचणे अत्यंत हानिकारक ठरू शकते.