रवी शास्त्री, अरुण, श्रीधर यांचे आरटी-पीसीआर अहवालही पॉझिटिव्ह, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्यावर अतिरिक्त जबाबदारीचे संकेत
लंडन / वृत्तसंस्था
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह सपोर्ट स्टाफमधील अन्य दोन सदस्यांचा आरटी-पीसीआर अहवाल देखील पॉझिटिव्ह आला असून यामुळे इंग्लंडविरुद्ध पाचव्या व शेवटच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाविना खेळावे लागेल, हे जवळपास निश्चित आहे. शास्त्रींसह गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण व क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांचे आरटी-पीसीआर अहवालही पॉझिटिव्ह आले आहेत. या त्रिकुटाच्या गैरहजेरीत फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्यावर अतिरिक्त जबाबदारीचे संकेत आहेत.
59 वर्षीय रवी शास्त्री यापूर्वी रविवार व सोमवारी घेण्यात आलेल्या लेटरल फ्लो टेस्टमध्ये (रॅपिड अँटिजन टेस्ट) पॉझिटिव्ह आले होते. नंतर आरटी-पीसीआर चाचणीत इन्फेक्शन असल्याचे अधोरेखित झाले.
भरत अरुण, आर. श्रीधर व फिजिओ नितीन पटेल या सर्वांनाही आयसोलेट केले गेले आहे. अरुण व श्रीधर यांचे अहवालही पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त असून पुढील किमान 10 दिवस ते आयसोलेशनमध्ये असतील. भारत-इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटी शुक्रवार दि. 10 सप्टेंबरपासून खेळवली जाणार आहे.
‘दोन्ही लेटरल फ्लो टेस्टमध्ये अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर शास्त्री आरटी-पीसीआर चाचणीतही पॉझिटिव्ह ठरले. त्यांना घसादुखीसारखी लक्षणे जाणवत आहेत. ते 10 दिवस आयसोलेशनमध्ये असतील’, असे बीसीसीआयमधील एका सूत्राने गोपनियतेच्या अटीवर सांगितले. पाचवी व शेवटची कसोटी आता अवघ्या तीन-एक दिवसांच्या उंबरठय़ावर असल्याने शास्त्री संघासमवेत नसतील. त्यांचा आयसोलेशन कालावधी या लढतीनंतरच संपणार असल्याचेही या सूत्राने सांगितले.
अगदी फिजिओ नितीन पटेल हे देखील मँचेस्टरकडे प्रवास करु शकणार नाहीत, हे स्पष्ट आहे. अरुण, श्रीधर व नितीन हे शास्त्री यांच्या थेट संपर्कात आले असल्याने त्यांना 5 दिवसांचे आयसोलेशन क्रमप्राप्त आहे.
सदर तिन्ही प्रशिक्षक कर्णधार विराट कोहली व फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्या थेट संपर्कात असतील, असे संकेत आहेत. मँचेस्टरमध्ये फिजिओ नसतील. मात्र, योगेश परमार व निक वेब, सोहम देसाई हे ट्रेनर असतील. याशिवाय, थ्रो डाऊन स्पेशालिस्ट दयानंद समवेत असतील, असे सूत्राने स्पष्ट केले.
काही दिवसांपूर्वी रवी शास्त्री एका पुस्तक प्रकाशन सोहळय़ाला उपस्थित राहिले होते. त्यावेळी किंवा एकदा त्यांनी 5 हजार क्षमतेच्या लिफ्टचा वापर केला होता, काही व्हीआयपी त्यात होते. यादरम्यान त्यांना संसर्ग झाला असण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे. बीसीसीआयमधील काही पदाधिकाऱयांनी पुस्तक प्रकाशन सोहळा का आयोजित केला गेला होता, अशी पृच्छा केली असल्याचेही वृत्त आहे.
तूर्तास, संघातील सर्व खेळाडू शनिवारी सायंकाळी व रविवारी सकाळी घेतल्या गेलेल्या 2 लेटरल फ्लो टेस्टमध्ये निगेटिव्ह आले आहेत. सर्व खेळाडू व सपोर्ट स्टाफमधील सदस्यांचे पूर्ण लसीकरण झालेले आहे.
बॉक्स (आयपीएल लोगो)
खेळाडूंसाठी स्वतंत्र आयपीएल बबल
इंग्लंडविरुद्ध पाचव्या व शेवटच्या कसोटी सामन्यानंतर आयपीएलमधील समाविष्ट काही भारतीय खेळाडू इंग्लंडमधून थेट युएईला रवाना होणार आहेत. त्यांच्यासाठी मँचेस्टरमध्येच स्वतंत्र आयपीएल बबल असेल. त्यानंतर दि. 15 सप्टेंबर रोजी या खेळाडूंचे बबल टू बबल ट्रान्स्फर होईल, याचा सूत्रांनी यावेळी उल्लेख केला आहे.