वृत्तसंस्था/ लंडन
प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत मँचेस्टर युनायटेड क्लबची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाल्याने या क्लबच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी व्यवस्थापक ओले गुनार सोलशार यांची तडकाफडकी हकालपट्टी केली. प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत मँचेस्टर युनायटेड क्लबला आतापर्यंत 7 पैकी 5 सामने गमवावे लागले असल्याने त्यांना या स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवणे कठीण झाले आहे. शनिवारी या स्पर्धेतील झालेल्या सामन्यात वेटफोर्डने मँचेस्टर युनायटेडचा 4-1 अशा गोलफरकाने पराभव केला. त्या पार्श्वभूमीवर नॉर्वेच्या सोलशार यांची हकालपट्टी झाली.
गेली तीन वर्षे सोलशार मँचेस्टर युनायटेडचे व्यवस्थापक कार्यरत होते. शनिवारच्या सामन्यातील पराभवानंतर मँचेस्टर युनायटेड क्लबचा या स्पर्धेतील पुढील सामना व्हिलारेलविरुद्ध स्पेनमध्ये होणार आहे. मँचेस्टर युनायटेडच्या स्पेनच्या दौऱयापूर्वीच या संघाच्या व्यवस्थापक पदाची हंगामी जबाबदारी मिचेल कॅरीककडे सोपविण्यात आली आहे. सोलशार यांच्या प्रशिक्षण स्टाफमध्ये मिचेलचा समावेश होता.
मँचेस्टर युनायटेडला यापूर्वी पारंपरिक प्रतिस्पर्धी लिव्हरपूलविरुद्ध 5-0 तर मँचेस्टर सिटीविरुद्ध मागील महिन्यात 2-0 फरकाने पराभवाचे धक्के बसले होते. सोलशार यांनी त्यावेळी संघाच्या नामुष्कीजनक कामगिरीबद्दल दिलगिरी व्यक्त केली. तसेच, आगामी सामन्यात संघाच्या कामगिरीत व्यापक सुधारणा दिसून येईल, असे अभिवचनही दिले. पण, प्रत्यक्षात पराभवाची, अपयशाची मालिका सुरुच राहिली होती. प्रीमियर लीगमध्ये सध्याच्या घडीला मँचेस्टर युनायटेडचा संघ सातव्या स्थानी फेकला गेला असून 12 सामन्यांनंतर ते गुणतालिकेतील लीडर चेल्सीपेक्षा 12 गुणांनी पिछाडीवर आहेत.
मँचेस्टर युनायटेड संघाने याच हंगामात सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोला करारबद्ध केले असून इंग्लंडचा जॅडोन सँचोही संघात समाविष्ट आहे. स्वतः सोलशारने 1996 ते 2007 या कालावधीत युनायटेड संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यांना डिसेंबर 2018 मध्ये जोस मॉरिन्होच्या जागी अंतरिम प्रशिक्षकपदी रुजू केले गेले आणि त्यानंतर प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले गेले.