वृत्तसंस्था/ कोलॉन
मँचेस्टर युनायटेडने युरोपा लीगच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला असला तरी त्यांना विजयासाठी जादा वेळेपर्यंत संघर्ष करावा लागला. 95 व्या मिनिटाला पोर्तुगालच्या ब्रुनो फर्नांडेसने पेनल्टीवर नोंदवलेल्या एकमेव गोलामुळे कडवा प्रतिकार करणाऱया डेन्मार्कच्या एफसी कोपनहेगनवर त्यांना विजय मिळविता आला.
युरोपाची द्वितीय विभागीय स्पर्धा 2017 मध्ये जिंकणाऱया युनायटेडची उपांत्य लढत येत्या रविवारी सेव्हिला किंवा वुल्व्हरहॅम्प्टन वांडरर्स यापैकी एकाशी होईल. कोपनहेगनचा गोलरक्षक कार्ल जोहान जॉन्सनने अप्रतिम गोलरक्षण केल्यामुळे युनायटेडला विजयासाठी बराच संघर्ष करणे भाग पडले. पाचवेळा ही स्पर्धा जिंकणाऱया सेव्हिलाची लढत वुल्व्हरहॅम्प्टनशी तर शख्तार डोनेत्स्कची लढत एफसी बेसेलविरुद्ध होणार आहे. याशिवाय इंटरमिलाननेही बायर लिव्हरकुसेनचा 2-1 असा पराभव करून उपांत्य फेरीत स्थान मिळविले आहे. जर्मनीतील या मिनी स्पर्धेत बाद फेरीचा केवळ एकच सामना घेण्यात येत आहे.
कोपनहेगन संघाने पूर्वार्धात युनायटेडवर वर्चस्व राखले होते. पण त्यांनी अनेक संधी वाया घालविल्या. पहिल्या 20 मिनिटांत तर युनायटेडची बचावफळी पूर्णपणे विस्कळीत झाली होती. मोहमद डरामी व जोनास विंड यांचे प्रयत्न फोल ठरविण्यासाठी त्यांना बरेच परिश्रम घ्यावे लागले. मध्यंतराच्या ठोक्याला आपण आघाडी घेतलोय असे युनायटेडला वाटत होते. मॅसन ग्रीनवूडने गोलजाळय़ाच्या दिशेने अचूक फटका मारत गोल नोंदवला होता. पण व्हीएआर रिव्हय़ूनंतर पंचांनी तो ऑफसाईड ठरविल्याने त्यांची निराशा झाली.
पूर्वार्धात बॅकफूटवर राहिल्यानंतर उत्तरार्धात युनायटेडने जोरदार चढाया करीत अनेक संधी मिळविल्या. पण विंड त्यांच्या मार्गात येत राहिल्याने त्या फोल ठरल्या. निर्धारित वेळेत गोलकेंडी न फुटल्याने जादा वेळ देण्यात आला आणि 95 व्या मिनिटाला फर्नांडेसने स्पॉटकिकवर गोल नोंदवून सामना निकाली केला. कोपनहेगनचा गोलरक्षक जॉन्सनने उत्कृष्ट बचावाचे प्रदर्शन करीत 13 वेळा गोल वाचवले. 2009 नंतर गोलरक्षकाने या स्पर्धेत गोल वाचवलेली ही विक्रमी संख्या आहे.