ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसेतील जवळीकही वाढताना दिसत आहे. आज सकाळी मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली, हे समजू शकले नाही. मात्र, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
काही दिवसांपूर्वीच भाजप आणि मनसेच्या युतीबाबत माध्यमांमधून वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर भाजपचे आशिष शेलार यांनी शिवतीर्थ या निवासस्थानी राज ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज ठाकरेंची भेट घेतली. आता महानगरपालिका निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीत चर्चा झाली असावी, अशी शक्यता जाणकारांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, आज शिवाजी पार्कमधील रहिवाशांचे शिष्टमंडळही राज ठाकरे यांची भेट घेणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शिवाजी पार्कवर सुरु असलेल्या अतिक्रमणाचा मुद्दा या भेटीत मांडला जाणार आहे. त्यावर राज ठाकरे कोणती भूमिका घेतात, हे पहावे लागेल.