प्रतिनिधी / बेळगाव
भाजपच्या बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवार मंगला अंगडी यांनी रविवारी बेळगाव शहरातील महाद्वार रोड, जुने बेळगाव या परिसरात जोरदार प्रचार केला. जुने बेळगाव येथील बनशंकरी नगर येथे झालेल्या बैठकीत मंगला अंगडी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. महिलांशी संवाद साधताना महिला सबलीकरणासाठी भाजपलाच मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. महाद्वार रोड परिसरात प्रचारफेरी काढत त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या.
सौंदत्ती तालुक्मयातील मुन्नोळी येथे भाजपतर्फे प्रचारसभा घेण्यात आली. यावेळी मंत्री के. एस. ईश्वरप्पा, अमरसिंग पाटील, आनंद मामणी, रमेश देशपांडे, विनय देसाई, इरण्णा चंदरगी यांनी मंगला अंगडी यांना मतदान करून केंद्रातील मोदी सरकारचे हात मजबूत करण्याचे आवाहन केले. कै. सुरेश अंगडी यांनी केलेल्या विकासकामांमुळे आज हा संपूर्ण परिसर विकसित झाला आहे. यापुढेही असाच विकास होण्यासाठी भाजपला मतदान करा, असे त्यांनी सांगितले.
रविवारी सायंकाळी धर्मनाथ भवन येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजपच्या नेत्या शोभा करंदलाजे यांच्यासह स्थानिक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना वाचा फोडली. भाजपतर्फे चन्नम्मा चौकातून रविवारी भव्य बाईक रॅली काढण्यात आली. यामध्ये भाजपचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.