बेंगळूर
राज्यातील बेळगाव लोकसभा तसेच बिदर जिल्हय़ातील बसवकल्याण आणि रायचूर जिल्हय़ातील मस्की विधानसभा मतदारसंघांमध्ये 17 एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे. दरम्यान, गुरुवारी रात्री भाजपने उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यानुसार बेळगाव लोकसभा मतदारसंघातून दिवंगत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळणार याविषयी निर्माण झालेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
राज्यातील एक लोकसभा आणि दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये 23 मार्च रोजी अधिसूचना जारी झाली आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवार निवडीविषयी कुतूहल निर्माण झाले होते. केंद्रीयमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बेळगाव लोकसभा मतदारसंघातून त्यांच्या पत्नी मंगला अंगडी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राज्य भाजपमधून सुरेश अंगडी यांच्या कुटुंबातील व्यक्तीलाच तिकीट देण्याची मागणी होत होती. अंगडी यांची मुलगी श्रद्धा शेट्टर यांना तिकीट देण्याबाबत भाजपमध्ये चर्चा सुरू होती.
मस्की, बसवकल्याणमधीलही उमेदवार जाहीर
मस्की व बसवकल्याण विधानसभा मतदारसंघांसाठी देखील भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. मस्कीतून प्रतापगौडा पाटील आणि बसवकल्याणमधून शरणू सलगार यांना तिकीट देण्यात आले आहे.