चिपळूण
चिपळूण रेल्वेस्थानकानजीक अज्ञात व्यक्तीने रेल्वेट्रकच्या मुख्य लाईनच्या हिल जॉईंटच्या 2ट फिशप्लेट्स व 4 नटबोल्टस काढून लोकमान्य टिळक टर्मिनस मंगलोर स्पेशल एक्स्प्रेस या रेल्वेगाडीला अडथळा केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी घडला. मात्र हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने मंगलोर स्पेशल एक्स्प्रेसचा अपघात टळला. या प्रकरणी पोलीस स्थानकात अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत स्वप्नील सुधाकर झगडे (27, कनिष्ठ अभियंता, चिपळूण कोकण रेल्वे) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील झगडे हे चिपळूण कोकण रेल्वे येथे कार्यरत असून अंजनी-चिपळूण मध्यापर्यंत रेल्वे ट्रक कि. मी 119/8 ते 154/1 पर्यंतच्या कार्यक्षेत्राचे सेक्शन ज्युनिअर इंजिनिअर म्हणून काम पाहतात. 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वा. ते रात्री 8 च्या सुमारास चिपळूण रेल्वे स्थानकानजीक रेल्वे ट्रक कि.मी. 128/6-7 या ठिकाणी जॉइं&टच्या दोन फिशप्लेट्स व त्याचे 4 नटबोल्ट्स पूर्णपणे काढून टाकल्याचे आढळले. या घटनेमुळे लोकमान्य टिळक टर्मिनस मंगलोर स्पेशल एक्स्प्रेस गाडीला अडथळा निर्माण केला. झगडे यांनी या बाबतची तक्रार पोलीस स्थानकास दिली. त्यानुसार अज्ञातावर शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमरसिंग पाटील करीत आहेत.