पाच म्हशी गंभीर आजारी : सहा लाखांचा फटका
प्रतिनिधी / बेळगाव
मंगळवारपेठ, टिळकवाडी येथील पिराजी रामजी चौधरी (गवळी) यांच्या केवळ आठ दिवसात सात जातीवंत म्हशी दगावल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामध्ये तीन दुभत्या, दोन गाभण व दोन रेडकांचा समावेश आहे. सात म्हशी दगावल्याने गवळी कुटुंबीयांना 5 ते 6 लाखांचा फटका बसला आहे. शिवाय अद्यापही 5 म्हशी गंभीर आजारी असल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. पशुसंगोपन खात्याच्या वैद्यकीय अधिकाऱयांनी औषधोपचार सुरू ठेवले असले तरी म्हशींना नेमका कोणता आजार झाला आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
पिराजी चौधरी गवळी यांचा जनावरांचा गोठा आहे. या म्हशींच्या दुधावरच त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. मात्र, दुभत्या म्हशी अचानक दगावल्याने चौधरी कुटुंबीयांवर संकट कोसळले आहे. त्यामुळे संबंधित खात्याने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. पशुसंगोपन खात्याचे डॉ. श्रीकांत गावी, डॉ. मल्लाप्पा रावण्णावर, श्रीकांत कोवली आदींनी गंभीर आजारी असलेल्या म्हशींवर औषधोपचार करून रक्ताचे नमुने घेतले आहेत. चौधरी कुटुंबीयांनी म्हशींच्या चाऱयासाठी व खाद्यासाठी मोठय़ा प्रमाणात खर्च केला आहे. मात्र, अचानक म्हशी दगावत असल्याने कुटुंबीय अडचणीत आले आहे. गंभीर आजारी असणाऱया म्हशींच्या औषधोपचारासाठी मोठा खर्च येत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
गेल्या आठ-दहा दिवसात आमच्या सात म्हशी दगावल्या आहेत. त्यामुळे मोठा फटका बसला आहे. म्हशींसाठी चारा विकत घेतला आहे. खाद्यासाठीही मोठय़ा प्रमाणात खर्च करतो. आमचा उदरनिर्वाह म्हशींच्या दुधावरच आहे. त्यामुळे आमच्यावर संकट कोसळले आहे. त्यातच आणखी पाच म्हशींची तब्येत गंभीर आहे. त्यामुळे संबंधित खात्याने आपल्याकडे लक्ष देऊन भरपाईसाठी मदत करावी.
पिराजी चौधरी (गवळी)