निर्यातदार महासंघ, जीसीसीआय यांचे आयोजन
प्रतिनिधी / पणजी
भारतीय निर्यातदार संघटना महासंघ आणि गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय निर्यात परिषद येत्या दि. 22 मार्च रोजी दोनापावला येथे होणार आहे. या परिषदेच्या माध्यमातून खास करून गोव्यातील निर्यात प्रमाण दुप्पट वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत जीसीसीआयचे अध्यक्ष राल्फ डिसोझा यांनी ही माहिती दिली. त्यावेळी श्री. नंदकिशोर, खालीद खान आणि पल्लवी आरोंदेकर यांची उपस्थिती होती.
’गोव्यातील विद्यमान निर्यात दुप्पट वाढविण्याच्या भविष्यातील योजना’ या संकल्पनेवर ही दिवसभराची परिषद होणार आहे. सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होईल. त्यानंतर पहिल्या सत्रात सकाळी 11 ते 1.30 पर्यंत विविध चर्चासत्रे व तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्यात प्रामुख्याने डीआयटीसीच्या संचालक श्वेतिका सच्चन, एमपीटीचे ट्राफिक मॅनेजर हिमांशू शेखर, कृषी संचालक नेव्हील आल्फोन्सो, गोवा नागरी हवाई सेवा संचालक डॉ. शानभोगे, डिसोझा ग्रूपचे अध्यक्ष राल्फ डिसोझा, फॉमेन्तो रिसोर्सिसचे व्यवस्थापकीय संचालक अंबर तिंबले आदींचा सहभाग असेल.
दुसऱया सत्रात दुपारी 3 ते 5 दरम्यान फेडरेशनचे महासंचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय सहाय यांचे उपस्थित निर्यातदारांसाठी आंतरराष्ट्रीय व्यापार आणि वाणिज्य या विषयावर प्रशिक्षण होईल.
याच परिषदेदरम्यान व्यापार, उद्योग, ई-वाणिज्य, काजू आणि फेणी, पर्यटन, कापड व हस्तकला, कला व संस्कृती, खाद्यपदार्थ आदी विविध विषयांवर प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे.
गोव्यातून आतापर्यंत खनिजासह मासे, कृषी, फार्मास्युटिकल्स, शिपबिल्डिंग तसेच पर्यटन क्षेत्राशी संबंधित अनेक उत्पादनांची निर्यात करण्यात येत आहे. त्यातून एप्रिल 2020 ते मार्च 2021 या कालावधीत 2.30 बिलियन यूएस डॉलरची निर्यात करण्यात आली. 2027-28 पर्यंत हे प्रमाण 1 ट्रिलियन यूएस डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून त्यादृष्टीने महासंघाचे प्रयत्न सुरू आहेत. या परिषदेच्या माध्यमातून निर्यातदारांना आपल्या उद्दीष्टपूर्तीची अनोखी संधी प्राप्त होणार आहे.
निर्यातक्षम उत्पादनांसाठी कोल्ड स्टोरेजसारख्या साठवणूक सुविधांच्या अभावामुळे खास करून अल्पावधीत खराब होण्याची शक्यता असलेल्या उत्पादनांची निर्यात आजपर्यंत मर्यादित राहिली आहे. त्यामुळे निर्यात प्रमाण वाढविण्याचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. यावर उपाय म्हणून नव्याने बांधण्यात येत असलेल्या मोप विमानतळावर अशा साठवणूक सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे. त्याशिवाय धारबांदोडा तालुक्यातही अशाच प्रकारची अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली.