दिवसभरात एकाचा मृत्यू, 253 जण झाले कोरोनामुक्त
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ झाली. मंगळवारी देखील जिल्हय़ात 219 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मात्र गेल्या चार दिवसांमधील आकडय़ांपेक्षा हा आकडा कमी आहे. मंगळवारी एकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे तर 253 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.
कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. सध्या 2 हजार 164 जण कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. जिल्हय़ामध्ये आतापर्यंत 31 हजार 76 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर 28 हजार 552 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 360 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
जिल्हा आरोग्य विभागाने कोरोनाच्या वाढत्या संख्येची दखल घेत स्वॅब तपासणी वाढविली आहे. सरकारी हॉस्पिटल्ससह काही खासगी हॉस्पिटलमध्येही कोरोना रुग्णांसाठी बेडची सोय केली आहे. मात्र कोरोनाचा आकडा वाढत असल्यामुळे बेड कमी पडताना दिसत आहेत. पहिल्या कोरोना लाटेच्या सुरूवातीला ज्या प्रकारे गोंधळ उडाला होता त्याच प्रकारे आता गोंधळ उडताना दिसत आहे. ऑक्सिजन उपलब्ध असला तरी बेड मात्र उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक कोरोनाग्रस्त रुग्णाला दाखल करण्यासाठी गयावया करताना दिसत आहेत. पहिल्या लाटेनंतर अधिक दक्षता घेतली गेली नाही. कोरोना कमी झाला म्हणून बेसावध असताना ही दुसरी लाट आली आणि सरकार बरोबरच जिल्हा प्रशासन देखील हतबल झाल्याचे सध्या तरी दिसून येत आहे. कोरोनाने मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी कोरोनाग्रस्तांचा आकडा मात्र वाढत चालला आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.
आरोग्य विभागाने तसेच राज्य सरकारने अनेक निर्बंध घातले आहेत. क्लोजडाऊनचा आदेश दिला आहे. बुधवार दि. 28 पासून आता क्लोजडाऊन होणार आहे. त्यानंतर आकडेवारी कमी होणार की नाही? हे समजणार आहे. मात्र सध्या तरी कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढताना दिसत आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे बनले आहे.