सध्या 339 सक्रिय रुग्ण : कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
मंगळवारी जिल्हय़ामध्ये 8 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. रुग्णसंख्या कमी झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. असे असले तरी अजूनही कोरोना गेलेला नाही. तेव्हा प्रत्येकाने याबाबत काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हय़ामध्ये सध्या 339 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 895 जणांचा मृत्यू झाला आहे. आता रुग्णसंख्या कमी झाली आहे. मात्र गणेशोत्सव तोंडावर आहे. त्याचबरोबर इतर सणांनाही आता सुरूवात होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य खात्याने केले आहे. जिल्हय़ात आतापर्यंत 79 हजार 384 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामधील 78 हजार 150 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आता महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.