823 नवे कोरोनाबाधित तर 19 जणांचा मृत्यू : जिल्हय़ामध्ये 11 हजार 852 सक्रिय रुग्ण
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनामुक्त होणाऱयांची संख्या आता वाढत चालली आहे. मंगळवारी तब्बल 4 हजार 270 कोरोना रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. मंगळवारी 19 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्हय़ामध्ये 823 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळात व कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊन लागू केला आहे. तरीदेखील कोरोना रुग्णसंख्या कमी होण्याची कोणतीच चिन्हे नाहीत.
रुग्णांवर त्वरित उपचार आवश्यक सध्या शहरासह संपूर्ण जिल्हय़ामध्ये कोविड चाचणी मोहीम राबविण्यात येत आहे. कोरोनाची लागण होताच तातडीने उपचार झाले तर रुग्ण वाचू शकतो. मात्र, बरेच जण कोरोना झाला तरी उपचार करून घेण्यास टाळाटाळ करत आहेत. ऑक्सिजन पातळी कमी झाल्यानंतरच उपचारासाठी पुढे येत आहेत, हे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळेच मृत्यूच्या प्रमाणामध्ये वाढ झाल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
मंगळवारी कोरोनामुक्त होणाऱयांची संख्या वाढली तरी मृत्यूचे प्रमाणदेखील वाढले आहे. गेल्या 24 तासात 19 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 570 जण दगावले आहेत. जिल्हय़ामध्ये आतापर्यंत 66 हजार 676 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर 54 हजार 354 रुग्ण बरे झाले आहेत. बरे होणाऱयांची संख्या अधिक असली तरी याची लागण होऊ नये यासाठी खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे.
जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत खबरदारी घेण्याचे आवाहन वारंवार केले आहे. मात्र, अजूनही नागरिकांमध्ये गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. सध्या कोरोना चाचणीचे प्रमाण वाढविण्यात आल्याने रुग्णसंख्या वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे. असे असले तरी त्याला कुठे तरी आळा बसणे गरजेचे आहे. यासाठी कोरोनाचे नियम प्रत्येकाने पाळलेच पाहिजेत. तेव्हाच कोरोनाला आपण थोपवू शकतो, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
आता विकेंड लॉकडाऊनमध्येही वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी शनिवारपासून सोमवारपर्यंत लॉकडाऊन होते. मात्र, आता शुक्रवारपासूनच कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी आता तरी सावध होणे गरजेचे आहे. सध्या जिल्हय़ामध्ये 11 हजार 852 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर विविध हॉस्पिटल्स व कोविड केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
मंगळवारी शहरातील आदर्शनगर-वडगाव, आनंदवाडी-शहापूर, अळवण गल्ली-शहापूर, अनगोळ, अंजनेयनगर, अन्नपूर्णावाडी, अयोध्यानगर, बसव कॉलनी, भाग्यनगर, शिवाजीनगर, हनुमाननगर, राणी चन्नम्मानगर, चिदंबरनगर, दरबार गल्ली, कॉलेज रोड, वडगाव, फुलबाग गल्ली, गणपत गल्ली, हिंदवाडी, पाटील गल्ली, पारिजात कॉलनी-वडगाव, रामतीर्थनगर, सदाशिवनगर, खडेबाजार, कावेरीनगर, खासबाग, कुवेंपूनगर, महांतेशनगर, मुजावर गल्ली, नाथ पै सर्कल-शहापूर, नेहरूनगर, जुने गांधीनगर, टिळकवाडी, उद्यमबाग, वैभवनगर, वीरभदेश्वरनगर, विवेकानंदनगर, समर्थनगर, सरस्वतीनगर-हिंदवाडी, शिवबसवनगर, सह्याद्रीनगर, शिवाजीनगर, शाहूनगर, समर्थनगर, श्रीनगर यासह इतर परिसरात रुग्ण आढळले आहेत.
ग्रामीण भागातील गौंडवाड, पिरनवाडी, के. के. कोप्प, गणेशपूर, हिंडलगा, हंगरगा, हुंचेनहट्टी, बडाल अंकलगी, गोजगा, कलखांब, निलजी, धामणे, कंग्राळी बी. के., काकती, के. के. कोप्प, कुरबरहट्टी-धामणे, मच्छे, मंडोळी, मारिहाळ, पंतबाळेकुंद्री, पिरनवाडी, किणये, सुळेभावी, उचगाव, विजयनगर, वाघवडे, पारिश्वाड, अलतगा, अगसगा, आंबेवाडी, बामणवाडी, मच्छे, देवगिरी, मरिकट्टी, सांबरा, बसुर्ते यासह इतर गावांमध्ये रुग्ण आढळले आहेत.