प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना काहीसा आटोक्यात आला असून कोरोना रुग्ण बरे होण्याच्या संख्येत समाधानकारक वाढ होत आहे. मंगळवारी 47 जण कोरोना मुक्त झाले आहेत. तर 30 नवे रुग्ण आढळले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना लागण झालेल्या संख्येत घट झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
गेल्या 8 महिन्यांपासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. या कोरोनामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये मोठी भीती निर्माण झाली होती. लॉकडाऊनसारख्या पर्यायदेखील अवलंबविण्यात आला. मध्यंतरी कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आता माणसाच्या मनातील भीती कमी झाली आहे.
मंगळवारी 30 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांवर सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 47 जण बरे झाले आहेत. सध्या संपूर्ण जिल्हय़ात 444 जण कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे.