प्रतिनिधी / बेळगाव
लॉकडाऊन काळात विनाकारण फिरणाऱयांची वाहने जप्त करण्याचा बडगा पोलिसांनी उगारला आहे. मंगळवारी अशा विनाकारण फिरणाऱया व्यक्तींची 62 वाहने जप्त केली आहेत. तसेच विनामास्क फिरणाऱया 330 जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
कोरोनाची महामारी वाढत असताना अजूनही याबाबत जनतेमध्ये म्हणावे तसे गांभीर्य दिसून येत नाही. वारंवार सूचना करूनही कोरोनाचे नियम पायदळी तुडविण्यात येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी आता वाहने जप्त करूनच धडा शिकविण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेकांची वाहने जप्त केली आहेत.
मंगळवारी खरेदीसाठी ग्रामीण भागातील जनतेने बेळगाव शहरामध्ये मोठी गर्दी केली होती. त्यामुळे पोलिसांनीही कारवाई करण्यास सुरुवात केली. मंगळवारी 62 वाहने जप्त केली तर अनेकांवर दंडात्मक कारवाईही केली आहे. सर्वांनी तोंडाला मास्क वापरावे, असे आवाहन केल्यानंतरही अनेक जण विनामास्क फिरत होते. अशा 330 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.