वृत्तसंस्था /बीजिंग :
लाल ग्रहाच्या दिशेने चीनने पावले टाकली आहेत. रोव्हर मिशन टू मार्स अंतर्गत चीनने स्वतःचा तिआनवेन 1 अंतराळयान प्रक्षेपित केला आहे. या प्रक्षेपकात 6 चाकांचा रोबोट आहे. हॅनियान येथून ही मोहीम प्रक्षेपित करण्यात आली आहे. तिआनवेन शब्दाचा अर्थ स्वर्गाला प्रश्न विचारणे असा होतो. फेब्रुवारीपर्यंत लाल ग्रहाच्या कक्षेत हे यान पोहोचणार आहे.
तिआनवेन 1 मध्ये पाठविण्यात आलेला रोव्हर दोन किंवा तीन महिन्यांपर्यंत मंगळाच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न करणार नाही. 1970 मध्ये अमेरिकेनेही असेच धोरण स्वीकारले होते. मंगळावरील स्थिती व वातावरण समजून घेत रोव्हरला धोक्यांपासून वाचविण्यास हा कालावधी सहाय्यभूत ठरणार आहे.
संयुक्त अरब अमिरातने मंगळ ग्रहासाठी सोमवारी स्वतःचा होप उपग्रह प्रक्षेपित केला होता. सुमारे आठवडय़ानंतर नासा ही अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नेक्स्ट जनरेशन रोव्हर मंगळ ग्रहाच्या दिशेने प्रक्षेपित करणार आहे.
मंगळाच्या पृष्ठभागावर रोव्हरचे सेफ लँडिंग व्हावे असा चीनचा प्रयत्न आहे. अमेरिकेने 2000 साली स्पीरिट मिशन अंतर्गत रोव्हर लालग्रहावर पाठविला होता. तिआनवेन 1 ची संरचना बऱयाचअंशी स्पीरिटसारखीच आहे. चीनचा रोव्हरही मंगळाच्या पृष्ठभागाचे अध्ययन करण्यास सहाय्यभूत ठरणार आहे. या रोव्हरमध्ये उच्चक्षमतेचे कॅमेरे बसविले असून तेथील टेकडय़ा आणि पाण्याचा शोध लावण्यासही सक्षम आहे.