बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोना संसर्ग झाल्याच्या भीतीने मंगळूर येथे एका जोडप्यानं आत्महत्या केली. मात्र, आता मृत्यूनंतर शवविच्छेदन केलं असता अहवालात धक्कादायकमाहिती समोर आली. या जोडप्यानं कोरोना आणि ब्लॅक फंगसच्या भितीपोटी आत्महत्या केली तसं काही झालेलं नसल्याचं वैद्यकीय अहवालात समोर आलं आहे. या दाम्पत्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आलाय. यामुळे या जोडप्याच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, रमेश (वय ४०) आणि गुना सुवर्णा (वय ३०) असं आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचं नाव आहे. दोघेही मंगळूरमध्ये एका आपर्टमेंटमध्ये राहात होते. मंगळवारी पहाटे चित्रपुरा येथील एका अपार्टमेंटमध्ये एका जोडप्याने गळफास लावून आत्महत्या केली.
धक्कादायक म्हणजे आत्महत्येपूर्वी या दाम्पत्याने आपल्या मेसेजची ऑडिओ क्लिप शहर पोलीस आयुक्त एन. शशीकुमार यांना पाठवली होती. यामध्ये त्यांनी ब्लॅक फंगसमुळे भीती वाटत असल्याचं म्हणत आम्ही आत्महत्या करणार असल्याचं सांगितलं होतं. यावर पोलीस आयुक्तांनी त्यांना कोणतंही टोकाचं पाऊल उचलू नका असं आवाहन केलं. त्यानंतर त्यांनी तातडीने त्या दाम्पत्याचा शोध सुरु केला. तसेच त्यांनी मीडियालाही आवाहन करुन, या दाम्पत्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पण तोपर्यंत या दाम्पत्याने आत्महत्या केली होती.
सुसाईड नोटमध्ये पतीने म्हटलं, “माझ्या पत्नीला मधुमेह आहे. न्यूज चॅनल्समध्ये दाखवल्याप्रमाणे ज्या मधुमेही रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला, त्यांना ब्लॅक फंगसचा धोका आहे. त्यामुळे ब्लॅक फंगसमध्ये निकामी होऊ शकतात. त्याची किंमत चुकवावी लागू शकते, त्यामुळे आम्ही आत्महत्या करण्याचा निर्णय घेतलाय.” असं म्हंटल आहे.