प्रतिनिधी/ मंगळूर
कर्नाटक पोलिसांनी तब्बल पाच महिन्यानंतर मंगळूर विमानतळावर दहशत माजविण्याच्या उद्देशाने स्फोटके (आयईडी) लावल्याप्रकरणी आरोपी आदित्यराव याच्याविरूद्ध 700 पृष्ठांचे आरोपपत्र दाखल केले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या आधि 20 जानेवारीला मंगळूर विमानतळाच्या बाहेरील गेटवर एका संशयास्पद बॅगमध्ये सदर स्फोटके आढळून आली होती. आईडीचा स्फोट होण्यापूर्वी स्फोटक यंत्रात बिघाड झाल्याने गजर झाला. यानंतर 36 वषीय राव याने दोन दिवसात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. त्याला अटक करून बेकायदेशीर कृती (प्रतिबंध) कायद्यांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानुसार विमानतळावर दहशत माजविण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले. एप्रिल महिन्यात या प्रकरणाची चौकशी करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती आणि राज्यसरकारच्या मान्यतेसाठी आरोपपत्र पाठविण्यात आले होते अशी माहिती पोलिसांनी दिली.