नासाच्या पर्सिव्हरन्स रोव्हरची अफाट कामगिरी : जीवसृष्टीच्या शोधात महत्त्वाचे पाऊल
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
मंगळ ग्रहावर जीवसृष्टीच्या शोधाकरता गेलेल्या अमेरिकेची अंतराळ संस्था नासाच्या पर्सिव्हरन्स रोव्हरने आणखी एक यश मिळविले आहे. लाल ग्रहाच्या वायुमंडळात या रोव्हरने ऑक्सिजन निर्मितीत यश मिळविले आहे. याकरता रोव्हरमध्ये एक विशेष उपकरण बसविण्यात आले होते. मार्स ऑक्सिजन इन-सिटू रिसोर्स युटिलायजेशन एक्सपेरिमेंट म्हणजे मोक्सी असे याचे नाव आहे. जीवनासाठी अत्यंत आवश्यक ऑक्सिजन मंगळाच्या वायुमंडळात 0.2 टक्क्यांपेक्षाही कमी आहे.
कारच्या बॅटरीच्या आकाराचा हा रोबोट 2030 पर्यंत वैज्ञानिक मंगळावर पाठवू इच्छिणाऱया डिव्हाइसचे छोटे प्रारुप आहे. एका वृक्षाप्रमाणेच मोक्सी देखील कर्बवायू शोषून घेतो. या उपकरणाची निर्मिती मंगळावरील वायुतळाच्या दृष्टीकोनातून करण्यात आली आहे. हे उपकरण कर्बवायूच्या मॉलिक्यूल्सला ऑक्सिजन आणि कार्बन मोनोऑक्साईडमध्ये विभागते. ऑक्सिजनचे मॉलिक्यूल मिळून 99.2 टक्क्यांपर्यंत शुद्ध ओ2 तयार करतात. त्यानंतर हे श्वास घेण्यायोग्य ऑक्सिजन आणि कार्बन मोनोऑक्साइड वातावरणात सोडतात. भविष्यातील मोठय़ा उपकरणामध्ये ऑक्सिजन संग्रहीत केला जाणार आहे, ज्याचा माणूस आणि रॉकेट वापर करू शकतील.
एका तासात 10 ग्रॅम ऑक्सिजनचे लक्ष्य
मोक्सी एक छोटा प्रयोग आहे. जर अपेक्षेनुरुप या उपकरणाने काम केले तर एका तासात 10 ग्रॅम ऑक्सिजनची निर्मिती होऊ शकणार आहे. कार्बन मोनोऑक्साईड वातावरणात असणे किती धोकादायक ठरू शकते असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावर वायू मंगळाच्या वातावरणात परत ऑक्सिजनमध्ये मिसळून पुन्हा कर्बवायूत रुपातंरित होणार असल्याचे स्पष्टीकरण मोक्सीचे मुख्य संशोधक मायकल हेट यांनी दिले आहे.
इनजेन्युइटीचे उड्डाण अमेरिकेची अंतराळ संस्था नासाच्या पर्सिव्हरेन्स रोव्हरसह मंगळावर पोहोचलेल्या इनजेन्युइटी हेलिकॉप्टरने उड्डाण करून इतिहास रचला आहे. इनजेन्युइटी हेलिकॉप्टरने मंगळ ग्रहाच्या जेजेरो क्रेटरमध्ये निर्मित एका तात्पुरत्या हेलिपॅडवरून उड्डाण केले आहे. सुमारे 1.8 किलोग्रॅमचा हा रोव्हरक्राफ्ट स्वतःच्या चार कार्बन-फायबर ब्लेडच्या मदतीने उड्डाण करत आहे.