नासाच्या पर्सिवरन्स मार्स रोव्हरचे प्रक्षेपण : विशेष उपकरणाद्वारे महत्त्वपूर्ण प्रयोग
वॉशिंग्टन/ वृत्तसंस्था
नासा या अमेरिकेच्या अंतराळ संस्थेच्या पर्सिवरन्स मार्स रोव्हरने स्वतःसोबत विशेष उपकरण घेत मंगळ ग्रहाच्या दिशेने प्रयाण केले आहे. पर्सिवरन्स रोव्हर मंगळावरील संशोधनादरम्यान मानवी जीवनासाठी आवश्यक मापदंडांची पडताळणी करणार आहे. ऑक्सिजन (पृथ्वीवरील प्राणवायू) निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे एक उपकरण पर्सिवरन्स रोव्हरमध्ये बसविण्यात आले आहे. मंगळ ग्रहावरील वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण 0.2 टक्क्यांपेक्षाही कमी आहे.
‘मार्स ऑक्सिजन इन सिटू रिसोर्स युटिलायजेशन एक्सपरिमेंट’ असे या महत्त्वपूर्ण उपकरणाचे नाव आहे. संक्षिप्त स्वरुपात मॉक्सी असे याचे नाव आहे. कारच्या बॅट्रीच्या आकाराइतका हा रोबो एका मोठय़ा उपकरणाचे छोटे प्रारुप आहे. तर मोठे उपकरण 2030 पर्यंत मंगळ ग्रहावर पाठविण्याची वैज्ञानिकांची योजना आहे. एका वृक्षाप्रमाणेच मॉक्सी देखील कर्बवायू शोषून घेणार आहे. हे उपकरण मंगळ ग्रहाचे वातावरण लक्षात घेऊनच निर्माण करण्यात आले आहे.
ऑक्सिजनची निर्मिती
सीओ2च्या मॉलिक्यूल्सना हे उपकरण ऑक्सिजन आणि कार्बन मोनोऑक्साइडमध्ये विभक्त करणार आहे. ऑक्सिजनचे मॉलिक्यूल मिळून 99.2 टक्क्यांपर्यंत शुद्ध ओ2 निर्माण करतील. त्यानंतर हे उपकरण श्वास घेण्यायोग्य ऑक्सिजन आणि कार्बन मोनोऑक्साइड वातावरणात सोडणार आहे. भविष्यात मोठय़ा उपकरणात प्राणवायू साठविला जाणार आहे. या प्राणवायूचा माणसांकडून वापर होणार आहे.
भविष्याची तयारी
कार्बन मोनोऑक्साइड वायुमंडळात परत जाऊन ऑक्सिजनच्या संपर्कात येईल आणि तो मग कार्बन डायऑक्साइडमध्ये रुपांतरित होईल. मॉक्सी एक छोटा प्रयोग आहे. अपेक्षेनुरुप या उपकरणाने काम केल्यास एका तासात 10 ग्रॅम ऑक्सिजन निर्माण करू शकणार आहे. 18 फेब्रुवारी 2021 रोजी मंगळ ग्रहावर उतरल्यावर हे उपकरण काम करण्यास प्रारंभ करणार असल्याची माहिती संशोधक मायकल हेट यांनी दिली आहे.