पहिला अरब देश ठरणार : 17 जुलै रोजी मिशन होपचे प्रक्षेपण
वृत्तसंस्था/ दुबई
चालू महिन्यात मंगळ ग्रहाच्या दिशेने पृथ्वीवरुन तीन यानांचे प्रक्षेपण होणार आहे. अमेरिका आणि चीनसह संयुक्त अरब अमिरातही स्वतःची मंगळ मोहीम राबविणार आहे. संयुक्त अरब अमिरातच्या (युएई) मिशन होपचे 17 जुलै रोजी प्रक्षेपण होणार आहे. युएईची मोहीम यशस्वी ठरल्यास अन्य ग्रहावर यान पाठविणारा तो पहिला अरब देश ठरणार आहे.
जपानच्या कागोशिमा येथील तानिगाशिमा अंतराळ केंद्रातून स्वतःच्या होप या ऑर्बिटरला प्रक्षेपित करण्यासाठी युएई सज्ज आहे. मंगळाचे पहिले ग्लोबल वेदर मॅप तयार करण्याचे लक्ष्य बाळगण्यात आले आहे. मंगळावर पोहोचलेले यापूर्वीचे रोव्हर दिवसाच्या मर्यादित वेळेतच संबंधित हिस्स्याचे निरीक्षण करू शकत होते. परंतु होपची ऑर्बिट अंडाकृती असल्याने ती पूर्ण करण्यास या रोव्हरला 55 तास लागणर आहेत. याच कारणामुळे हे रोव्हर मंगळच्या हिस्स्यांवर दिवसा तसेच रात्री अधिक काळासाठी नजर ठेवू शकणार आहे.
लाल ग्रहाचा अभ्यास
होपचा व्हिजिबल लाइट कॅमेरा आणि इन्फ्रारेड स्पेक्ट्रोमीटर मंगळावरील ढग आणि धूळयुक्त वादळांचा अभ्यास करणार आहे. तसेच अल्ट्राव्हायोलेट स्पेक्ट्रोमीटर मंगळाच्या वातावरणातील वायूंचे निरीक्षण करणार आहे. दोन वर्षांच्या मोहिमेदरम्यान होप दरदिनी हवामानात होणारे बदल तसेच ऋतूचक्रांचा अभ्यास करणार आहे. मिशन होपमुळे भविष्यातील मानवयुक्त अंतराळ मोहिमांच्या तयारीकरता मदत होणार आहे.
जगाला पुरविणार विदा
मिशन होमधून प्राप्त होणारा विदा (डाटा) आंतरराष्ट्रीय समुदायाला उपलब्ध केला जाणार असल्याचे युएईच्या विज्ञान मंत्री आणि या प्रकल्पाच्या प्रमुख सारा-अल अमीरी यांनी म्हटले आहे.