मालवणातील तिन्ही कामांना यापूर्वीच सुरुवात : निधी आता मंजूर झाल्याची शक्यता?
मनोज चव्हाण / मालवण:
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या 118 कोटी रुपयांच्या विकास आराखडय़ाला मान्यता देण्यात आल्याचे सांगण्यात आले. यामध्ये म्युझिकल फाऊंटन, ओपन जीम आणि बायोकंपोस्ट मशीन यासाठी मान्यता देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात मालवण शहरातील रॉक गार्डन याठिकाणी म्युझिकल फाऊंटनचे काम सुरू आहे. रॉक गार्डन आणि बोर्डिंग मैदान याठिकाणी ओपन जीमचे साहित्य बसविण्यात आले आहे आणि बायोकंपोस्ट मशीन एक मच्छीमार्केट आणि एक कचरा डंपिंग यार्ड याठिकाणी सुरू आहे. ही वस्तुस्थिती असताना आता नवीन आराखडय़ात ही सर्व कामे पुन्हा होणार काय? की या झालेल्या कामांसाठीचा निधी आता मंजूर करण्यात आला? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
दरम्यान, याबाबत नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मालवण शहरातील विकासकामांसाठी शासनाने मोठय़ा प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शासनाचे आभार मानत आहे. सद्यस्थितीत म्युझिकल फाऊंटनचे काम सुरू असून ओपन जीम आणि बायोकंपोस्ट ही साधने आणि मशिनरी सुरू आहेत. यामुळे आता मंजूर झालेला निधी या कामांसाठी खर्च करायचा की नवीन कामे करायची, याबाबत शासनाकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे. शासनाच्या दरबारात मालवणसाठी खास जागा असल्याने याहीपुढे मालवणचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल राहणार आहेत.
रॉक गार्डनमध्ये म्युझिकल फाऊंटन
सुमारे एक कोटी रुपये खर्चून रॉक गार्डनमध्ये म्युझिकल फाऊंटनचे काम गेले काही महिने सुरू आहे. याठिकाणी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सदरचा फाऊंटन महत्वाची भूमिका बजावणार आहे. मात्र सदरचे काम सुरू केलेले असताना त्याठिकाणी कोणत्याही प्रकारे योजनेची माहिती अगर निधी आणि कामाचे अंदाजपत्रक याचा फलक लावण्यात आला नव्हता. शासनाचे निर्देश असतानाही म्युझिकल फाऊंटनच्या ठिकाणी माहिती फलक लावण्यात आल्याचे दिसून आले नाही.
ओपन जीमचे तीनतेरा
गेले वर्षभर मालवण नगर पालिकेच्या आवारात सडत असलेले ओपन जीमचे साहित्य रॉक गार्डन आणि बोर्डिंग मैदान याठिकाणी बसविण्यात आले आहे. ओपन जीमचे साहित्य थेट जिल्हा क्रीडा विभागाकडून खरेदी करण्यात आले असून त्यांच्याचकडून ते बसविण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारे सदरचे साहित्य बसविताना काळजी घेण्यात आलेली नसल्याने दोन्ही ठिकाणचे साहित्य तुटलेल्या स्थितीत आहे. अवघ्या एका महिन्यातच सदरचे साहित्य तुटलेले असल्याने या साहित्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बोर्डिंग मैदानात बसविण्यात आलेल्या ठिकाणी अस्वच्छता आणि वाढलेली झाडी यामुळे त्याठिकाणी व्यायाम करण्यासाठी येणाऱया नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
बायोकंपोस्ट मशीन सुरू
पालिकेने बायोकंपोस्ट मशीन खरेदी केल्या असून दोन ठिकाणी त्यांचे काम सुरू आहे. यातून उपलब्ध होणारे खतही विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. यामुळे आता नव्याने बयोकंपोस्ट मशिनरी मिळणार काय? असा प्रश्न आहे.