आमदार वैभव नाईक यांनी ‘पीडब्ल्यूडी’च्या अधीक्षक अभियंत्यांना घेतले फैलावर
प्रतिनिधी / कणकवली
जिल्हय़ातील मंजूर असलेली विकासकामे सुरु करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होत असलेल्या दिरंगाईबाबत आमदार वैभव नाईक यांनी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात आलेल्या अधीक्षक अभियंत्यांची भेट घेतली. अधिकाऱयांच्या निष्काळजीपणाबद्दल अधीक्षक अभियंता छाया नाईक यांना फैलावर घेतले. तसेच मंजूर कामांची लवकरात लवकर टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना वैभव नाईक यांनी दिल्या.
आमदार नाईक यांनी मंत्रालयात पाठपुरावा करून विविध रस्ते, पूल बांधकामासाठी विविध योजनांमधून निधी मंजूर करून आणला आहे. मात्र, सा. बां. विभागाच्या अधिकाऱयांच्या निष्काळजीपणामुळे वेळेत निविदा प्रक्रिया न झाल्याने कामे रखडली आहेत. अधिकाऱयांकडून वर्कऑर्डर वेळेवर दिली जात नाही, काम करणाऱया ठेकेदारांना अडचणी निर्माण केल्या जातात, याबाबत नाराजी व्यक्त करत सा. बां. विभागाच्या अधिकाऱयांना आमदार वैभव नाईक यांनी खडेबोल सुनावले.
यावेळी सा. बां. विभागाच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, कार्यकारी अभियंता संजय शेवाळे, सावंतवाडी कार्यकारी अभियंता श्रीकांत माने, उपअभियंता हिवाळे, उपअभियंता सौ. के. के. प्रभू, शाखा अभियंता पी. व्ही. कांबळी, श्री. बासुतकर, एन. पी. गाडे आदी उपस्थित होते.