–संगमेश्वर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरीची कारवाई
प्रतिनिधी/ रत्नागिरी
वडिलोपार्जीत शेतजमीन मिळकतीवर तक्रारदार यांचे सहहिस्सेदार म्हणून नाव दाखल करून ते मंजुरीसाठी पाठवण्यासाठी 25 हजाराची लाच स्वीकारणाऱ्या संगमेश्वरमधील देवळे येथील मंडल अधिकारी व कनकाडीच्या तलाठ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग-रत्नागिरीच्या युनिटने ही यशस्वी सापळा कारवाई करून संबंधित मंडल अधिकारी उल्हास विश्वनाथ मुऊडकर (46) व संतोष महादेव मोघे, तलाठी सजा कनकाडी या दोघांना ताब्यात घेण्यात आले. यातील तक्रारदार हे 29 वयाचे आहेत. त्यांचे वडिलोपार्जीत शेतजमीन मिळकतीवर सहहिस्सेदार म्हणून नाव दाखल करून ते मंजुरीसाठी पाठवण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी होती. पण त्यासाठी कनकाडी येथील लोकसेवक संतोष मोघे यांने 28 फेब्रुवारी 2023 रोजी मोबाईल फोनची मागणी केली होती. सहहिस्सेदार नोंद मंजूर करण्यासाठी यातील आरोपी लोकसेवक मंडल अधिकारी उल्हास मुरूडकर याने 28 फेब्रुवारी व 13 मार्च 2023 रोजी 25,000 रूपये लाच रकमेची मागणी केली होती.
ही मागणी केलेली लाच रक्कम 25,000 रूपये आरोपी लोकसेवक उल्हास मुरूडकर याने बुधवार 29 मार्च रोजी दुपारी 1.45 च्या सुमारास स्वीकारली. त्यावेळेस सापळा रचलेल्या कारवाई पथकाने मुरूडकरला रंगेहाथ पकडले. ही स्वीकारलेली रक्कमही हस्तगत करण्यात आली आहे. या प्रकरणी मुरूडकर व मोघे या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यविऊद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. ही सापळा कारवाई ला. प्र. वि. ठाणे परिक्षेत्र पोलीस अधीक्षक सुनील लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक ला.प्र.वि. रत्नागिरी पर्यवेक्षण अधिकारी सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण ताटे, पो.ह. संतोष कोळेकर, पो.ना.दीपक आंबेकर, पो. शि. हेमंत पवार, पो. शि. राजेश गावकर, चा.पो.ना. प्रशांत कांबळे यांच्या सापळा पथकाने केली.