प्रतिनिधी/ मडगाव
गोवा फॉरवर्ड पक्षाच्या सत्तेखालील मडगाव पालिका मंडळाने कार्यकाळ संपता संपता 43 कोटींचा निधी वापरून गोवा घनकचरा व्यवस्थापन महामंडळामार्फत सात बायोमिथेनेशन कचरा प्रक्रिया लघुप्रकल्प सोनसडय़ावर स्थापित करण्याच्या प्रस्तावावर घेतलेला ठराव बाजूला ठेवून मडगाव पालिकेवरील सरकारनियुक्त प्रशासक प्रसन्न आचार्य व मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांनी पालिका संचालकांनी मंजूर केलेले दोन बायोमिथेनेशन लघुप्रकल्प उभारण्यास पसंती दिली आहे. त्यासाठी निविदा मागविल्या असल्याची माहिती मुख्याधिकारी फर्नांडिस यांनी दिली आहे.
सध्या शासन-नियुक्त प्रशासक आणि मुख्याधिकारी यांच्याद्वारे पालिकेचे प्रशासन हाताळले जात असून पालिका प्रशासन संचालक (डीएमए) डॉ. तारिक थॉमस यांनी याआधी मंजुरी दिलेले दोन बायोमिथेनेशन कचरा प्रक्रिया लघुप्रकल्प उभारण्यास त्यांनी प्राधान्य देताना निविदा मागविल्या असल्याचे सांगण्यात आले आहे. पालिकेने सध्या जे दोन बायोमिथेनेशन लघुप्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे त्यांची किंमत प्रत्येकी अंदाजे 2.49 कोटी रुपये आहे. या दोनपैकी एक प्रकल्प सोनसडय़ावर आणि इतर कचरा हाताळण्यासाठी दुसरा प्रकल्प एसजीपीडीए मार्केटमध्ये उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मुख्याधिकाऱयांनी सांगितले आहे.
डीएमएच्या कार्यालयाद्वारे मंजूर करण्यात आलेल्या दोन बायोमिथेनेशन लघुप्रकल्पांची किंमत प्रत्येकी 2.49 कोटी रु. आहे, तर प्रस्तावित सात बायोमिथेनेशन प्रकल्पांसाठी प्रत्येकी तब्बल 4.81 कोटी रु. खर्च येणार आहे. किमतीमध्ये मोठी तफावत असल्याने यासंदर्भात विरोधी गटातील नगरसेवक व शॅडो कौन्सिलने प्रश्न उपस्थित केले होते. एकंदरित 43 कोटी ही प्रकल्पांची किंमत नसून त्यात अन्य बांधकामांचा खर्च समाविष्ट असल्याचे घनकचरा व्यवस्थापन महामंडळाने स्पष्ट केले होते. यात सोनसडा येथे प्रत्येकी 2000 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या दोन शेड, संरक्षक भिंत आणि रस्ते आणि अन्य आवश्यक बांधकामांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले होते. महामंडळाचा अंदाजित खर्च प्राथमिक स्वरूपाचा आहे. त्यामुळे अंतिम विश्लेषणात किंमत खाली येऊ शकते, असे स्पष्ट करण्यात आले होते.
7 बायोमिथेशन प्रकल्पांचा प्रस्ताव मंजुरीसाठी ‘डीएमए’कडे पाठविण्याचा निर्णय
पालिका मंडळाने 43 कोटी खर्चून 7 बायोमिथेनेशन कचरा प्रक्रिया लघुप्रकल्प घनकचरा व्यवस्थापन महामंडळामार्फत उभारण्यासाठी घेतलेला ठराव पालिका संचालकांकडे मंजुरीसाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी फर्नांडिस यांनी या प्रतिनिधीशी बोलताना दिली. या सातपैकी प्रत्येक बायोमिथेनेशन प्रकल्पाची किंमत 4.8?1 कोटी अशी आहे. सदर अंदाजित किंमत प्राथमिक स्तरावरील असल्याचे मुख्याधिकाऱयांनी स्पष्ट केले. निर्णय घेण्याच्या आधी गोवा घनकचरा व्यवस्थापन महामंडळाने (जीडब्ल्यूएमसी) तयार केलेल्या प्राथमिक अंदाजांचा अभ्यास करण्याची विनंती पालिका संचालकांना करण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.