आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडून पाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रारंभ
प्रतिनिधी /बेळगाव
मंडोळीतील तीन पुरातन मंदिरांच्या विकासासाठी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी 1.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामधून पाडव्याच्या शुभमुहूर्तावर पूजा करून मंदिरांच्या जीर्णोद्धाराला सुरुवात करण्यात आली. यामध्ये मारुती मंदिर, कलमेश्वर मंदिर व विठ्ठल रखुमाई मंदिरांचा समावेश आहे. आमदार हेब्बाळकर यांनी, मंडोळीतील मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम करण्याचे भाग्य मला लाभले. ही ईश्वराचीच इच्छा आहे, असे सांगून आनंद व्यक्त केला. यासाठी निधी कमी पडल्यास अधिक निधी आणण्याची ग्वाही त्यांनी दिली.
अल्पसंख्याक कल्याण निधीअंतर्गत हलगा येथील जैन बस्तीसाठी 50 लाख रु., मुत्नाळ येथील जैन बस्तीसाठी 50 लाख, मण्णूर येथील जैन बस्तीसाठी 50 लाख व अनेक समुदाय भवनांसाठी निधी मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले.
राजहंसगडावर मूर्ती स्थापण्याचे कार्य 6 एप्रिलपासून सुरू करणार आहे. या गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाची स्थापना हा कर्नाटक व महाराष्ट्र यांच्यातील सामंजस्याचा उत्सव ठरेल, असे भाकित त्यांनी केले. चार वर्षात ग्रामीण भागात अनेक विकासकामे झाली असून सर्वांचे सहकार्य हवे, असे विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी सांगितले.
आमदार हेब्बाळकर यांनी अनेक विकासकामे केली असून यापुढेही अशीच कामे करू, अशी ग्वाही जिल्हा युवा काँग्रेस उपाध्यक्ष मृणाल हेब्बाळकर यांनी दिली. यावेळी एपीएमसी अध्यक्ष युवराज कदम, लक्ष्मी कणबरकर, महादेव पाटील व मान्यवर उपस्थित होते.