वार्ताहर / हिंडलगा
मंडोळी ग्राम पंचायतीच्या रिक्त असलेल्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत दोघाजणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. पण, सोमवार दि. 22 रोजी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सुभाष तळवार यांनी माघार घेतल्याने प्रतिस्पर्धी उमेदवार नागेश दोरण्णावर यांची बिनविरोध निवड झाली. यामुळे मंडोळी व हंगरगा ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.
मंडोळी गावातील वॉर्ड क्रमांक 3 मधील रिक्त असलेल्या मागासवर्गीय अ पुरुष जागेसाठी ही निवडणूक दि. 29 रोजी होणार होती. त्यासाठी मंडोळीतील नागेश दोरण्णावर व हंगरगा येथील सुभाष तळवार यांनी उमेदवारी दाखल केली होती. पण, माघारीच्या शेवटच्या दिवशी सोमवारी सुभाष तळवार यांनी माघार घेण्याचे जाहीर केल्याने नागेश दोरण्णावर यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
निवडणूक बिनविरोध करण्यासाठी तालुका पंचायत माजी सदस्य यल्लाप्पा कणबरकर, संतोष तळवारकर, कृष्णा हुंदरे, मारुती दळवी, (ग्रा. पं. माजी अध्यक्ष) कल्लाप्पा साळवी, शिवाजी होसकोटी, राजू सुतार, संतोष पाटील, नारायण शहापूरकर यांनी विशेष परिश्रम घेतले. सुभाष तळवार यांनी सर्वांच्या विनंतीला मान देऊन माघार घेत बिनविरोध निवडणुकीला सहकार्य केल्याने ग्रामस्थांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. यावेळी सर्व सदस्य, पीडीओ व दोन्ही गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.