इच्छुक आमदारांची मोर्चेबांधणी : येडियुराप्पा दिवाळीपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्याच्या तयारीत : हायकमांच्या भेटीसाठी प्रतीक्षा
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यातील दोन विधानसभा आणि विधानपरिषदेच्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप उमेदवारांनी विजय संपादन केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी आता मंत्रिमंडळ विस्तारासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. ते आता हायकमांडच्या भेटीच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, मंत्रिपदासाठी इच्छुक असणारे आमदार मुख्यमंत्र्यांची भेटी घेऊन दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.
हायकमांडकडून निमंत्रण येताच येडियुराप्पा दिल्ली दौऱयावर जाणार आहेत. कोणत्याही क्षणी हायकमांड येडियुराप्पांनी दिल्लीला बोलावून घेण्याची शक्यता आहे. ही बाब हेरून मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱया भाजपमधील आमदारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर काही जणांनी दोन दिवसांपूर्वीच नवी दिल्लीत ठाण मांडले आहे. ते दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन मंत्रिपद देण्याची विनंती करत आहेत.
दिवाळीपूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा विचार मुख्यमंत्री येडियुराप्पांचा आहे. तीन ते चार विद्यमान मंत्र्यांना डच्चू देऊन 7 ते 8 आमदारांना मंत्रिपदे देण्याचा निर्णय येडियुराप्पा यांनी घेतला आहे. परंतु, कोणाला वगळावे, कोणाला संधी द्यावी, हे हायकमांडशी चर्चेनंतरच निश्चित होणार आहे. राज्यात भाजप सत्तेवर येण्यासाठी साहाय्य केलेल्यांना मंत्रिपदे मिळणार हे निश्चित आहे. राजराजेश्वरीनगर पोटनिवडणुकीत निवडून आलेले आमदार मुनिरत्न, विधानपरिषद सदस्य एम. टी. बी नागराज आणि आर. शंकर यांना मंत्रिपदे दिली जाणार आहेत. मंत्रिपदासाठी आर. शंकर आणि एच. विश्वनाथ यांनी नुकताच दिल्लीला धाव घेऊन हायकमांडवर आपला प्रभाव पाडण्याचा प्रयत्न चालविला आहे.
आमदार उमेश कत्ती, मुरुगेश निराणी, बसनगौडा पाटील यत्नाळ, एस. ए. रामदास, तिप्पारेड्डी, सी. पी. योगेश्वर, हालप्पा आचार, नरसिंह नायक, प्रीतम गौडा, हालाडी श्रीनिवास शेट्टी, सुनिलकुमार, एस. एस. अंगार आदी आमदार मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत.
जारकीहोळींच्या निवासस्थानी चर्चा
आमदार नरसिंह नायक यांनी मंत्री रमेश जारकीहोळी यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी, आपण मंत्रिपदासाठी अर्ज केला आहे त्यात विशेष काही नाही. पाणीपुरवठा योजनांसंबंधी चर्चा करण्यासाठी रमेश जारकीहोळींची भेट घेतल्याचे सांगितले.
चार-पाच आमदारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुख्यमंत्र्यांकडून मंत्रिमंडळ विस्तारासाठी हालचाली सुरू झाल्याने मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱया आमदारांची भोजनावळीच्या निमित्ताने बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. चार-पाच आमदारांनी बुधवारी येडियुराप्पांची भेट घेतल्यानंतर पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या निवासस्थानी भोजनावळीच्या निमित्ताने एकत्र आले. मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव आमदार एम. पी. रेणुकाचार्य, आमदार मुरुगेश निराणी, नरसिंह नायक, बेळ्ळी प्रकाश यांनी सकाळी येडियुराप्पा यांची भेट घेतली. नंतर दुपारी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या निवासस्थानी दाखल झाले.